
रत्नागिरी, 18 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगरपालिका आणि तीन नगर पंचायतीच्या २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे.रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिंदल म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाकडे २९ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे रत्नागिरी नगरपरिषदेमधील प्रभाग क्र. १० (१० अ व १० ब) करीता २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी ४ मतदान केंद्रे असतील.
दरम्यान, याआधी जिल्ह्यातील सात पालिका आणि नगर पंचायतीच्या १०० प्रभागांत निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत जिल्ह्यात ६८.१४ टक्के मतदान झाले. स्ट्राँग रूमकरिता एसआरपी व पोलीस यांच्यामार्फत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सिक्युरिटी ऑडिट करण्यात आले आहे. सुरक्षा कक्षामध्ये व बाहेरील बाजूस सीसीटीव्ही व्यवस्था बसविण्यात आली आहे. अग्निशमन यंत्रणा ठेवण्यात आली असून, व्हॅक्युम क्लिनर व्यवस्था, वाळवी पेस्ट कंट्रोल उपाययोजना करण्यात आली असल्याचे श्री. जिंदल यांनी सांगितले.
दि. २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून, यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी