उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार केवळ ११ दिवस
अमरावती, 19 डिसेंबर (हिं.स.) महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रचारासाठी उमेदवारांना केवळ ११ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. एका प्रभागात तब्बल १५ ते २५ हजार मतदारसंख्या असताना इतक्या कमी वेळेत मतदारांपर्यंत पोहोचणे हेच म
उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार केवळ ११ दिवस


अमरावती, 19 डिसेंबर (हिं.स.)

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रचारासाठी उमेदवारांना केवळ ११ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. एका प्रभागात तब्बल १५ ते २५ हजार मतदारसंख्या असताना इतक्या कमी वेळेत मतदारांपर्यंत पोहोचणे हेच मोठे आव्हान उमेदवारांना ठरणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून (दि.२३) सुरू होणार असून, त्याआधीच संभाव्य उमेदवारांनी तयारीला वेग दिला जात आहे. तिकीट मिळताच प्रचार सुरू करता यावा, यासाठी प्रभागनिहाय संपर्क यादी, बूथनिहाय कार्यकर्ते, गाठीभेटींचे नियोजन आणि प्रचार साहित्याची पूर्वतयारी केली जात आहे. विशेषतः कमी कालावधीत पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात येत आहे.

मोठ्या प्रभागात प्रत्यक्ष घराघरात पोहोचण्यासाठी वेळ अपुरा असल्याने प्रचाराच्या पद्धतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पदयात्रा, कोपरा /सभा, छोट्या बैठका, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, मोबाइल प्रचार वाहनांद्वारे प्रचार यावर भर दिला जाणार आहे. अनेक पक्षांनी आधीच अनौपचारिक जनसंपर्क सुरू ठेवला आहे.

उमेदवारांची कसोटी

कमी कालावधीत मतदारांशी थेट संवाद साधणे, स्थानिक प्रश्नांवर स्वतःची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करणे ही मोठी कसोटी ठरणार आहे. इच्छुक उमेदवारांची नाराजी, तिकीट वाटपातील गणिते आणि मर्यादित प्रचार कालावधी या सगळ्यांचा सामना करताना राजकीय पक्षांची रणनीती किती प्रभावी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी जाहीर होताच प्रचाराला पूर्ण ताकदीने सुरुवात करण्याची तयारी अनेकांनी केली आहे.

प्रचारासाठी सज्ज

निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारासाठी सज्ज असून अनेकांनी आपआपल्या उमेदवारांचे नाव समोर करणे सुरु केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande