
अमरावती, 19 डिसेंबर (हिं.स.)
आयशर ट्रकमधून तस्करी करताना २० गोवंश ताब्यात घेतले. गुरुवारला ग्रामीण गुन्हे शाखेने शिरखेड पोलीस ठाण्याच्या परिसरात ही मोठी कारवाई केली. ट्रक सोडून दोन आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी दोघांचाही सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. या कारवाईत आयशरसह १८.५३ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.माहितीनुसार, गुरुवारी, ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विशाल रोकडे पथकासह शिरखेड पोलीस ठाण्याच्या परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, गोवंशीय जनावरे मोर्शीहून अमरावतीला आयशर ट्रकमध्ये नेली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.माहितीच्या आधारे, शिरखेड फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांना पाहताच ट्रक चालकाने गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. शिरखेड फाटाजवळशिरखेड रोडवर पोलिस पथकाने पाठलाग करून गाडी थांबवली. गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही आरोपींना सिनेस्टाईल अटक करण्यात आली. शेख साबीर शेख कादीर (३५, आर्वी, वर्धा जिल्हा) आणि शेख अयान शेख नसीर (२०, लालखाडी, क्लिनर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.
ट्रकची झडती घेतली असता २० गोवंशीय जनावरे आढळून आली. या कारवाईत एकूण१८५,३०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. जप्त केलेले वाहन, गोवंशीय जनावरे, मोबाईल फोन आणि दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी शिरखेड पोलिस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद आणि पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय ईश्वर वर्गे, विशाल रोकडे, संतोष तेलंग, दीपक पाल, मनोज कलासकर, अमित राऊत, गजानन तिजारे, नितेश असोलकर, दीपक पाटील, मारुती वैद्य आणि किशोर सुने यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी