
हिंगोली, 19 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील फेरफार नोंदी, अतिरिक्त नोंदी तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली महसूलविषयक प्रकरणे कोणतीही दिरंगाई न करता तात्काळ निकाली काढावीत. शेतकरी व नागरिकांना महसूल कार्यालयांमुळे अनावश्यक त्रास होऊ नये, याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित महसूल विभागाच्या सविस्तर आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, सहाय्यक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रगती चौंडेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी विभागीय आयुक्तांनी ई-चावडी प्रणाली, गाव नमुने क्रमांक १ ते २१ अद्ययावत भरणे, डी-४ घोषणापत्रे पूर्ण करणे, अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतजमिनींच्या नोंदी अचूकपणे करण्याबाबत सूचना दिल्या. पाच गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या प्लॉट वगळण्याची प्रक्रिया, अतिक्रमण प्रकरणे, तसेच सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महावितरण कंपनीकडून दाखल प्रलंबित प्रस्ताव व संबंधित क्षेत्रांसाठी लागणाऱ्या जमिनी बाबत चर्चा करण्यात आली.
‘जिवंत सातबारा’ अभियानाची सद्यस्थिती, जिल्ह्यातील अकृषक सातबारा वेगळे करण्याची कार्यवाही, डिमार्केशनपूर्वी केजीपी करणे, तसेच ज्या सातबारामध्ये कृषी व अकृषक क्षेत्र एकत्र नोंदलेले आहे ते नियमानुसार एकत्र ठेवणे अथवा आवश्यकतेनुसार वेगळे करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले. या प्रक्रियेत कोणतीही चूक राहू नये, यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.
गौण खनिज विभागांतर्गत शासकीय वसुली, नियोजन व अंमलबजावणी, गौण खनिज स्वामित्व शुल्काची प्रभावी वसुली, तसेच जिल्ह्यातील ४३ वाळू घाटांच्या निविदा व लिलाव प्रक्रियेबाबत माहिती घेण्यात आली. लिगो संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अतिरिक्त जमिनीच्या मागणीसाठी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी केलेल्या कारवाईचाही आढावा घेण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis