
मुंबई, 19 डिसेंबर (हिं.स.)। राज्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. पुणे, नागपूर, नाशिकसारख्या शहरांनंतर आता मुंबईलगतच्या मीरा-भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. मीरा-भाईंदरच्या तलाव रोड परिसरातील एका इमारतीत बिबट्या शिरल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तिघे जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे आठच्या सुमारास मीरा-भाईंदरच्या बीपी रोड मागील तलाव रोड परिसरात, साईबाबा हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या ‘पारिजात’ इमारतीत बिबट्याचा वावर आढळून आला. हा बिबट्या थेट एका घरात घुसला. त्या वेळी घरात चार जण उपस्थित होते, त्यात २५ वर्षांची एक तरुणी आणि काही पुरुषांचा समावेश होता. घरात शिरताच बिबट्याने सर्वांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घरात एकच गोंधळ उडाला आणि आरडाओरड सुरू झाली.
हल्ल्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांना घटनेची माहिती मिळाली. नागरिकांनी तातडीने पोलिसांना आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या हल्ल्यात तिघे जखमी झाले असून त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्या २५ वर्षांच्या तरुणीवर साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची आणि बघ्यांची गर्दी जमली होती. पोलिसांनी परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी बिबट्याला एका खोलीत बंद करून ठेवले होते. त्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू होते. वनविभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल होत आहेत. दाट लोकवस्तीच्या परिसरात बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule