
नांदेड, 19 डिसेंबर (हिं.स.)। डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक व उच्चक्षमतेची सिटी स्कॅन मशीन नव्याने कार्यान्वित करण्यात आली आहे.
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी येथील क्ष-किरणशास्त्र विभागामध्ये अत्याधुनिक व उच्चक्षमतेची Siemens 128 Slice सिटी स्कॅन मशीन नव्याने कार्यान्वित करण्यात आली आहे. याप्रगत वैद्यकीय सुविधेची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
ही Siemens 128 Slice सिटी स्कॅन मशीन अत्यंत जलद, अचूक व उच्च रिझोल्यूशन प्रतिमा देणारी असून अल्प वेळेत संपूर्ण शरीर तपासणी करण्याची क्षमता या मशीनमध्ये आहे. यामशीनच्या सहाय्याने मेंदूचे आजार, स्ट्रोक, मेंदूतील रक्तस्राव, हृदय व रक्तवाहिन्यांचे विकार, अपघातातील अंतर्गत दुखापती तसेच छाती व पोटातील गंभीर व गुंतागुंतीच्या आजारांचे अचूक व त्वरित निदान करणे शक्य होणार आहे.
अर्धांगवायूने ग्रस्त झालेल्या रुग्णांमध्ये मानेतील व मेंदूतील रक्तवाहिन्यांची तपासणी या यंत्रावर उपलब्ध आहे. अपघातग्रस्त रुग्णांच्या संपूर्ण शरीराचे सिटी स्कॅन करता येत असल्याने कमीत कमी वेळेत योग्य निदान करून प्रभावी व तातडीची रुग्णसेवा देणे शक्य होते. तसेच पाठीच्या मणक्यांशी संबंधित विविध आजारांचे निदान देखील या यंत्रावर करता येते. या यंत्राद्वारे महिला रुग्णांच्या गर्भाशयाची पिशवी तसेच इतर अवयवांतील विविध आजारांचे अचूक निदान करण्यात येते. तसेच लहान मुलांमधील दुर्धर आजारांचे निदान सुद्धा या अत्याधुनिक यंत्राद्वारे करण्यात येते.
या सिटी स्कॅन मशीनची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत : अत्यंत कमी वेळेत (हाय स्पीड स्कॅनिंग) तपासणी पूर्ण होणे, कमी किरणोत्सर्गात(Low Radiation Dose) उच्च दर्जाचे स्कॅन, 3D व 4D इमेजिंग सुविधेमुळे अधिक अचूक निदान, मेंदू, हृदय, फुफ्फुसे, पोट व संपूर्ण शरीराचे सविस्तर परीक्षण, अपघात ग्रस्त रुग्णांसाठी तातडीने संपूर्ण शरीराची सिटी स्कॅन सुविधा, हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे (CT Coronary Angiography) अचूक परीक्षण तसेच बालरुग्ण व वृद्ध रुग्णांसाठी सुरक्षित तपासणी व्यवस्था. या अत्याधुनिक सुविधेमुळे रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत सुलभता येऊन वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार असून गंभीर रुग्णांचे तात्काळ व अचूक निदान करणे शक्य होणार आहे.
नांदेड जिल्ह्यात अशाप्रकारची उच्च क्षमतेची Siemens 128 Slice सिटी स्कॅन मशीन एकमेव स्वरूपात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी, नांदेड येथे उपलब्ध झाली असून याचा थेट लाभ जिल्ह्यातील तसेच परिसरातील हजारो रुग्णांना होणार आहे.
या प्रसंगी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कुमार कापसे, विभागप्रमुख, क्ष-किरण शास्त्र डॉ. अमित पंचमहालकर, क्ष-किरणशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.अनिल तापडिया, सूक्ष्मजीवशास्त्र प्राध्यापक डॉ.एस.आर.मोरे, बधिरीकरणशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. वैष्णवी कुलकर्णी, बालरोग प्राध्यापक डॉ. किशोर राठोड यांच्या सह महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis