भारतात २०२६ मध्ये नवीन गाड्यांच्या आगमनाची निसानकडून घोषणा
मुंबई, 19 डिसेंबर (हिं.स.)। निसान मोटर इंडियाने २०२६ च्या सुरुवातीला भारतीय बाजारात आपली नवी गेम-चेंजिंग सात-सीटर बी-एमपीव्ही ‘ग्रॅव्हाइट’ सादर करण्याची घोषणा केली आहे. भारतासाठी नव्याने आखलेल्या आणि धोरणात्मक उत्पादन श्रेणीतील हे पहिलेच मॉडेल असून
Nissan Arrival New Vehicle


Nissan Announces New Vehicle


मुंबई, 19 डिसेंबर (हिं.स.)। निसान मोटर इंडियाने २०२६ च्या सुरुवातीला भारतीय बाजारात आपली नवी गेम-चेंजिंग सात-सीटर बी-एमपीव्ही ‘ग्रॅव्हाइट’ सादर करण्याची घोषणा केली आहे. भारतासाठी नव्याने आखलेल्या आणि धोरणात्मक उत्पादन श्रेणीतील हे पहिलेच मॉडेल असून, निसानच्या पुनरुज्जीवनाच्या प्रवासातील एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आधुनिक भारतीय कुटुंबांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेली ग्रॅव्हाइट किमतीबाबत जागरूक ग्राहकांसाठी आराम, वैविध्य आणि बदल करता येण्याची क्षमता यांचा नवा मानदंड प्रस्थापित करणार आहे.

ग्रॅव्हाइट हे नाव ‘गुरुत्वाकर्षण’ या संकल्पनेपासून प्रेरित असून संतुलन, स्थैर्य आणि शक्तिशाली आकर्षण यांचे प्रतीक आहे. १.४ अब्ज भारतीय आणि देशातील १९ हजारांहून अधिक भाषा व परंपरांपासून प्रेरणा घेत ही गाडी डिझाइन करण्यात आली आहे. त्यामुळे ती दैनंदिन वापरापासून ते लांबच्या कौटुंबिक प्रवासासाठी एक परिपूर्ण साथीदार ठरणार आहे. या एमपीव्हीमध्ये प्रशस्त केबिन, स्मार्ट स्टोरेज सोल्यूशन्स आणि अल्ट्रा-मॉड्यूलर सीटिंग देण्यात आले असून, प्रवासी व सामानाच्या गरजेनुसार अंतर्गत मांडणी सहज बदलता येईल.

डिझाइनच्या दृष्टीने ग्रॅव्हाइट निसानच्या जागतिक डिझाइन भाषेशी सुसंगत असून तिची सिग्नेचर सी-आकाराची फ्रंट ग्रिल रस्त्यावर ठळक उपस्थिती निर्माण करते. आकर्षक प्रमाणबद्धता, आत्मविश्वासपूर्ण बॉडी आणि विशिष्ट हूड ब्रँडिंगसह अद्वितीय रिअर-डोअर बॅजिंग यामुळे ग्रॅव्हाइट आपल्या श्रेणीत वेगळी ओळख निर्माण करते. मागील बाजूस निसानची सी-आकाराची इंटरलॉक थीम वापरण्यात आली असून त्यामुळे ही एमपीव्ही सहज ओळखता येईल.

ऑल-न्यू ग्रॅव्हाइटचे उत्पादन स्थानिक पातळीवर रेनॉल्टच्या चेन्नई येथील सुविधेत केले जाणार असून, त्यामुळे भारतीय बाजाराच्या गरजांनुसार खास तयार केलेली वाहने देण्याच्या निसानच्या वचनबद्धतेला बळ मिळणार आहे. जुलै २०२४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या निसानच्या महत्त्वाकांक्षी उत्पादन मोहिमेतील हे दुसरे मॉडेल असून, यानंतर २०२६ च्या मध्यावर ‘टेक्टॉन’ आणि २०२७ च्या सुरुवातीला एक नवी ७-सीटर सी-एसयूव्ही सादर करण्याचा कंपनीचा मानस आहे.

निसान एएमआयईओचे अध्यक्ष मॅसिमिलियानो मेसिना यांनी भारताला कंपनीसाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असल्याचे नमूद करत, ग्रॅव्हाइटचे उद्घाटन निसानच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे प्रतीक असल्याचे सांगितले. तर निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स यांनी ग्रॅव्हाइट ही भारतीय बाजारपेठेच्या गरजांवर केंद्रित असून, ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण करणारी गाडी असल्याचे स्पष्ट केले.

या वाढीस पाठबळ देण्यासाठी निसान देशभरातील टियर-१ आणि टियर-२ शहरांमध्ये आपल्या डीलरशिप नेटवर्कचा विस्तार करत आहे. याचबरोबर ‘मेड इन इंडिया’ मॅग्नाइट मॉडेलला मिळालेल्या यशामुळे भारत निसानसाठी उत्पादन व निर्यातीचे महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. ग्रॅव्हाइटच्या आगमनाने निसानच्या भारतातील भविष्यातील उत्पादन साखळीला आणखी बळ मिळणार असून, गाडीची वैशिष्ट्ये आणि किंमत याबाबतची सविस्तर माहिती आगामी काळात जाहीर केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande