
मुंबई, 19 डिसेंबर (हिं.स.)। सॅमसंगनं शुक्रवारी अधिकृतपणे आपला नवीन फ्लॅगशिप-ग्रेड मोबाइल प्रोसेसर एक्झिनोस 2600 जाहीर केला. हा केवळ सॅमसंगचाच नव्हे, तर जगातील पहिला 2 नॅनोमीटर प्रक्रियेवर आधारित चिपसेट असून त्यात प्रगत गेट-ऑल-अराऊंड (जीएए) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
ही पूर्णपणे एकात्मिक चिपसेट असून सीपीयू, जीपीयू आणि एनपीयू एकत्रितपणे डिझाइन करण्यात आले आहेत. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, गेमिंग आणि एकूणच परफॉर्मन्समध्ये मोठी सुधारणा होणार असल्याचा दावा सॅमसंगनं केला आहे. एक्झिनोस 2500 नंतरचा हा सॅमसंगचा सर्वात नवीन फ्लॅगशिप प्रोसेसर असून तो पुढील वर्षाच्या सुरुवातीला बाजारात येण्याची शक्यता आहे.
सॅमसंग फाउंड्रीच्या 2एनएम जीएए फॅब्रिकेशन प्रक्रियेवर तयार झालेल्या या चिपसेटमध्ये कंपनीच्या स्वतःच्या मालकीचं सीपीयू आर्किटेक्चर वापरण्यात आलं आहे. एक्झिनोस 2600 मध्ये दहा कोर असून त्यात एक C1-अल्ट्रा कोर 3.8 गीगाहर्ट्झपर्यंत, तीन C1-प्रो कोर 3.25 गीगाहर्ट्झ आणि सहा C1-प्रो कोर 2.75 गीगाहर्ट्झपर्यंत क्लॉक स्पीडवर काम करतात. पारंपरिक लिटल कोरचा वापर न करता कार्यक्षमता आणि पॉवर एफिशिअन्सी यांच्यात संतुलन साधण्यावर सॅमसंगनं भर दिला आहे.
ग्राफिक्ससाठी या चिपसेटमध्ये सॅमसंगचा एक्सक्लिप्स 960 डेका-कोर जीपीयू देण्यात आला असून तो आर्म v9.3 आर्किटेक्चरवर आधारित आहे. यासोबत 32K MAC एनपीयू देण्यात आला आहे, ज्यामुळे जनरेटिव्ह एआय कार्यक्षमतेत तब्बल 113 टक्क्यांची सुधारणा झाल्याचं सॅमसंगनं सांगितलं आहे. आर्मच्या स्केलेबल मॅट्रिक्स एक्स्टेंशन 2 (SME2) सपोर्टमुळे सीपीयूची एकूण कामगिरी 39 टक्क्यांनी वाढली असून पॉवर एफिशिअन्सीतही लक्षणीय सुधारणा झाली आहे. गेमिंगच्या बाबतीत रे-ट्रेसिंग परफॉर्मन्समध्ये 50 टक्क्यांची वाढ झाली असून एक्झिनोस न्यूरल सुपर सॅम्पलिंग (ENSS) तंत्रज्ञानामुळे एआय-आधारित रिझोल्यूशन अपस्केलिंग आणि फ्रेम जनरेशनद्वारे गेमिंग अनुभव तीनपट सुधारतो, असा दावा करण्यात आला आहे.
एक्झिनोस चिपसेटशी संबंधित थर्मल समस्यांवर मात करण्यासाठी सॅमसंगनं ‘हीट पास ब्लॉक’ हे नवं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. हे तंत्रज्ञान हीट सिंकसारखं कार्य करत असून उष्णता निघून जाण्याच्या प्रक्रियेत 16 टक्क्यांपर्यंत सुधारणा करते. त्यामुळे दीर्घकाळ गेमिंग किंवा एआय टास्कदरम्यानही स्थिर परफॉर्मन्स मिळण्याची अपेक्षा आहे.
कॅमेरा आणि डिस्प्ले सपोर्टच्या बाबतीतही एक्झिनोस 2600 मध्ये मोठी प्रगती करण्यात आली आहे. हा चिपसेट 320 मेगापिक्सेल सिंगल कॅमेरा किंवा 64 आणि 32 मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा कॉन्फिगरेशनला सपोर्ट करतो. 108 मेगापिक्सेल रिझोल्यूशनवर 30 एफपीएस व्हिडिओ रेकॉर्डिंग तसेच 8के 30 एफपीएस व्हिडिओ एनकोडिंग आणि डिकोडिंगची सुविधाही यात उपलब्ध आहे. डिस्प्लेसाठी 4के किंवा WQUXGA रिझोल्यूशन 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटपर्यंत सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि यूएफएस 4.1 स्टोरेजचाही सपोर्ट या चिपसेटमध्ये आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने एक्झिनोस 2600 मध्ये हार्डवेअर-बॅक्ड हायब्रिड पोस्ट-क्वांटम क्रिप्टोग्राफी देण्यात आली असून भविष्यातील सायबर धोक्यांपासून संरक्षण मिळेल, असा दावा सॅमसंगनं केला आहे. 2एनएम प्रक्रियेमुळे कार्यक्षमता, ऊर्जा कार्यक्षमता आणि थर्मल मॅनेजमेंटमध्ये मोठी झेप घेतल्याचं स्पष्ट होत आहे. सॅमसंगच्या इन-हाऊस सिलिकॉन विकासातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून गॅलेक्सी एस26 मालिकेतील निवडक मॉडेल्समध्ये हा चिपसेट वापरण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सॅमसंग क्वालकॉमसारख्या स्पर्धकांना थेट टक्कर देण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule