अमरावती महापालिकेत निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण
अमरावती, 19 डिसेंबर (हिं.स.)। अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची अधिकृत घोषणा करण्यात आली असून दिनांक १५ डिसेंबर २०२५ पासून आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त, निष्पक्ष व कायदेशी
महापालिकेत निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न


अमरावती, 19 डिसेंबर (हिं.स.)।

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची अधिकृत घोषणा करण्यात आली असून दिनांक १५ डिसेंबर २०२५ पासून आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त, निष्पक्ष व कायदेशीर पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला असून त्या अनुषंगाने निवडणूक अधिकाऱ्यांचे सविस्तर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी १, २, ३ तसेच क्षेत्रीय अधिकारी यांचे निवडणुकीसंदर्भातील प्रशिक्षण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, अमरावती महानगरपालिका येथे पार पडले.हे प्रशिक्षण अमरावती महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. प्रशिक्षण सत्रात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) विवेक जाधव व उपजिल्‍हाधिकारी निवडणूक शिवाजी शिंदे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सखोल व मुद्देसूद मार्गदर्शन केले. त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील कायदेशीर तरतुदी, आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी, निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी, नामनिर्देशन पत्रांची छाननी, प्रचार काळातील नियम, अपात्रतेचे निकष, उमेदवारी मागे घेणे, चिन्‍ह वाटप, मतपत्रिका छपाई, मतदान यंत्र तयार करणे, मतदान कर्मचारी नियुक्‍ती व प्रशिक्षण, साहित्‍य वाटप, प्रत्‍यक्ष मतदान, मतदान प्रक्रिया, मतमोजणी तसेच आचारसंहिता भंग झाल्यास करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी निवडणूक काळात सर्व अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता, तत्परता व निष्पक्षता राखून काम करावे, असे निर्देश दिले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने आपली जबाबदारी ओळखून कार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील शंका दूर होऊन अधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल तसेच आगामी महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पडण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.यावेळी अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्‍पा नाईक, उपायुक्‍त योगेश पिठे, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande