ट्रूकॉलरचे एआय व्हॉइसमेल फीचर भारतात लाँच
मुंबई, 19 डिसेंबर (हिं.स.)। ट्रूकॉलरने भारतातील अँड्रॉइड यूजर्ससाठी एक शक्तिशाली आणि पूर्णपणे मोफत एआय-सशक्त व्हॉइसमेल सुविधा लाँच केली आहे. या नव्या फीचरमुळे कॉलिंग अनुभव अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि सोयीस्कर होणार आहे. त्वरित ट्रान्सक्रिप्शन, ऑटोमॅ
AI Voicemail Feature


मुंबई, 19 डिसेंबर (हिं.स.)। ट्रूकॉलरने भारतातील अँड्रॉइड यूजर्ससाठी एक शक्तिशाली आणि पूर्णपणे मोफत एआय-सशक्त व्हॉइसमेल सुविधा लाँच केली आहे. या नव्या फीचरमुळे कॉलिंग अनुभव अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि सोयीस्कर होणार आहे. त्वरित ट्रान्सक्रिप्शन, ऑटोमॅटिक स्पॅम प्रोटेक्शन आणि ऑन-डिव्हाइस स्टोरेज ही या सुविधेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पारंपरिक व्हॉइसमेलप्रमाणे वेगळा नंबर डायल करणे किंवा PIN लक्षात ठेवण्याची गरज न पडता, यूजर्स थेट ट्रूकॉलर अ‍ॅपमधूनच व्हॉइसमेल रेकॉर्ड, साठव आणि ऐकू शकतात.

या एआय-सशक्त व्हॉइसमेलमध्ये स्मार्ट कॉल कॅटेगॉरायझेशन, प्रभावी स्पॅम फिल्टरिंग, अ‍ॅडजस्टेबल प्लेबॅक स्पीड आणि 12 भारतीय भाषांमधील ट्रान्सक्रिप्शनची सुविधा देण्यात आली आहे. हिंदी, बंगाली, मराठी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, गुजराती, नेपाळी, पंजाबी, संस्कृत आणि उर्दू या भाषांमध्ये काही सेकंदांत व्हॉइसमेलचे ट्रान्सक्रिप्शन उपलब्ध होते. त्यामुळे यूजर्सना संदेश ऐकण्याची सोय नसतानाही ते गुप्तपणे वाचता येतात.

ट्रूकॉलरचे सीईओ रिशित झुनझुनवाला यांनी सांगितले की, पारंपरिक व्हॉइसमेल ही जुनी संकल्पना असून आजच्या वेगवान संवाद पद्धतींसाठी ती पुरेशी नाही. ट्रूकॉलर व्हॉइसमेलद्वारे व्हॉइस मेसेजेस दैनंदिन जीवनात अधिक सहज बसतील अशा पद्धतीने पुन्हा मांडण्यात आले आहेत. ही सेवा मोफत, डिव्हाइस-नेटिव्ह आणि थेट कॉलिंगमध्ये एकत्रित करण्यात आली असून, ऑन-डिव्हाइस स्टोरेज, त्वरित ट्रान्सक्रिप्शन, स्पॅम प्रोटेक्शन आणि भारतीय भाषांचा व्यापक सपोर्ट देऊन जुन्या प्रणालींच्या अडथळ्यांना दूर करण्यात आले आहे. यामुळे अधिक समावेशक आणि विश्वासार्ह संवादाची दिशा तयार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

व्हॉइसमेलला कॉलिंग अनुभवाच्या केंद्रस्थानी आणून ट्रूकॉलर दैनंदिन संवाद प्लॅटफॉर्म म्हणून आपली भूमिका अधिक मजबूत करत आहे. स्पॅम आणि फ्रॉडविरोधातील लढ्यातही हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ट्रूकॉलरकडे सध्या 45 कोटींहून अधिक सक्रिय यूजर्स असून, लाँचपासून आतापर्यंत अ‍ॅपचे एक अब्जाहून अधिक डाउनलोड्स झाले आहेत. केवळ 2024 मध्येच जवळपास 56 अब्ज अनावश्यक कॉल्स ओळखून ब्लॉक करण्यात आले आहेत.

2009 साली स्थापन झालेल्या आणि स्टॉकहोममध्ये मुख्यालय असलेल्या ट्रूकॉलरचा हा नवा उपक्रम भारतीय भाषिक विविधतेला प्राधान्य देणारा ठरत आहे. या सुविधेमुळे भारतातील यूजर्सना अधिक सुरक्षित, खासगी आणि सोयीस्कर संवादाचा अनुभव मिळेल, तसेच सतत येणाऱ्या त्रासदायक कॉल्समुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande