
परभणी, 19 डिसेंबर (हिं.स.)। परभणी आगारासाठी 10 नवीन ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेसना मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे परभणी आगारासाठी सुसज्ज शिवाई इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत परिवहन विभागाने परभणी आगारासाठी 10 बसेस मंजूर केल्या आहेत, अशी माहिती परभणीचे खासदार संजय जाधव यांनी दिली.
या पर्यावरणपूरक व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या शिवाई इलेक्ट्रिक बसेस लवकरच परभणी जिल्ह्यातील विविध मार्गांवर धावणार असून, यामुळे प्रवाशांना आरामदायी व सुरक्षित प्रवासाचा लाभ मिळणार आहे. इंधन बचतीसह प्रदूषण कमी होण्यासही या बसेसचा मोठा हातभार लागणार आहे. या निर्णयामुळे परभणी आगाराच्या बससेवेत लक्षणीय सुधारणा होणार असून, प्रवाशांनी या आधुनिक बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार जाधव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis