
लातूर, 20 डिसेंबर, (हिं.स.)। हृदय असलेल्या गंजगोलाई परिसरात गुंडागर्दी आणि दहशतीचे सत्र सुरूच असून, गुरुवारी रात्री ९:३० च्या सुमारास एका किरकोळ कारणावरून ज्येष्ठ पत्रकार संजय गोरे आणि त्यांच्या महाविद्यालयीन मुलाला फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात गोरे यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याचा डोळा निकामी होता होता थोडक्यात बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोलाई परिसरातून जात असताना गाडीचा किरकोळ धक्का लागल्याचे निमित्त करून येथील ५-६ फेरीवाले आणि दुकानदारांनी संजय गोरे व त्यांच्या मुलाशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही कळण्याच्या आतच या टोळक्याने काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी दोघांनाही अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गोरे यांचा मुलगा प्रचंड भयभीत झाला होता. या मारहाणीत त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
गोलाईत फेरीवाल्यांची दहशत; यापूर्वीही फेरीवाल्याने वजन करावयाच्या भाटणे एकाचे डोके फोडले.
गंजगोलाई परिसरात फेरीवाले आणि काही दुकानदारांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. किरकोळ कारणावरून सामान्य नागरिक, महिला आणि वृद्धांना धमकावण्याचे प्रकार येथे नित्याचेच झाले आहेत. आता तर या समाजकंटकांची मजल थेट पत्रकारांवर हात उचलण्यापर्यंत गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे तर यापूर्वी फेरीवाल्याने शाब्दिक बाचाबाची झालेल्या ग्राहकास वजन करावयाच्या भाटणे डोके फोडले होते.
पोलिस व मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये भीती.
गोलाईतील अतिक्रमणे आणि या फेरीवाल्यांवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. पोलिसांचा आणि महानगरपालिकेचा धाक उरला नसल्याने हे लोक कोणालाही जुमानत नाहीत. रात्रीच्या वेळी या भागात फिरणे सामान्य जनतेसाठी आता जीवघेणे ठरू लागले आहे. या गंभीर घटनेनंतर पत्रकार वर्गातून तीव्र निषेध व्यक्त होत असून, संबंधित हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. वेळेत आवर न घातल्यास सामान्य जनतेला गोलाईत जाणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. मुली व महिला वर्ग असुरक्षित असुन मुली व महिलांना पाहुन फळ विक्रेते डाळिंब लय रसदार, सफरचंद लाल भडक, केळी घ्या लांब-लांब अशी दुहेरी अर्थाचे भाष्य करत अश्लील वर्तन करत ओरडतात यामुळेही मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis