
रत्नागिरी, 20 डिसेंबर, (हिं. स.) : येथील खल्वायन संस्थेची 320 वी मासिक संगीत मैफल पुण्याची उदयोन्मुख युवा गायिका कु. सावनी शिखरे हिच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच अभंग- नाट्यगीतांच्या सादरीकरणाने रंगतदार झाली.
येथील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात कै. विमलाबाई बळवंत लेले आणि कै. द्वारकानाथ सीताराम बाळ स्मृती मासिक संगीत सभा म्हणून साजऱ्या झालेल्या या संगीत सभेला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या सुरवातीला पुणे येथील किरण बापट यांच्या हस्ते नटराज पूजन, दीपप्रज्वलन होऊन श्रीफळ वाढविले गेले. प्रदीप तेंडुलकर यांनी प्रस्तावना करून कलाकारांची ओळख करून दिली. अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते कलाकारांचा गौरव करण्यात आला.
मैफिलीची सुरवात राग श्रीमधील तिलवाडा तालात निबद्ध असलेल्या 'वारी जाऊ रे' या बडा ख्यालाने झाली. त्यानंतर तराणा व यमन रागातील एक बंदिश झाली. विदुषी मंजुषा कुलकर्णी-पाटील, पंडित उल्हास कशाळकर व अन्य गुरूंकडून गायनाचे संस्कार झालेल्या सावनीने रागाची मांडणी आलाप, ताना याद्वारे चांगली केली. त्यानंतर तिने का धरीला परदेस, पद्मनाभा नारायणा, ज्या सुखाकारणे देव वेडावला, विष्णुमय जग, एकच रे मागणे आणि शेवटी अगा वैकुंठीच्या राया या भैरवीतील अभंगाने तिने मैफलीचा शेवट केला.
सावनीच्या आवाजाला आस चांगली असल्यामुळे तिचे गायन कर्णमधुर झाले. कार्यक्रमाला तेवढीच तोलामोलाची व सफाईदार साथसंगत संवादिनी - पुण्याचे प्रसिद्ध युवा वादक अथर्व कुलकर्णी व तबला रत्नागिरीचे प्रथमेश शहाणे यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी