
रत्नागिरी, 19 डिसेंबर, (हिं. स.) : देवरूख येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयात प्रा. विसुभाऊ बापट यांनी सादर केलेल्या 'कुटुंब रंगलय काव्यात' या त्यांच्या खास शैलीतील काव्यवाचनाला रसिकांनी भरभरून दाद दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्कार भारती उत्तर रत्नागिरी जिल्हा आणि श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाने संयुक्तरीत्या केले होते. वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. गजानन जोशी यांनी प्रा. विसुभाऊ बापट, संस्कार भारती उत्तर रत्नागिरी जिल्हा समिती महामंत्री मंगेश बापट, आनंद बोंद्रे, कुमार भाट्ये यांचे ग्रंथपुष्प देऊन स्वागत केले.
प्रा. संदीप मुळ्ये यांनी प्रास्ताविकात सांगितले, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने वर्षभरात विविध साहित्यिक उपक्रम आयोजित केले जात आहेत. यामध्ये तालुकावार साहित्य संमेलने, सुप्रसिद्ध वक्त्यांची व्याख्याने, स्मरणिका प्रकाशन, ग्रंथप्रदर्शने इत्यादींचा अंतर्भाव आहे. त्यानंतर प्रा. विसुभाऊ बापट यांचा परिचय करून दिला. संस्कार भारतीचे महामंत्री मंगेश बापट यांनी संस्कार भारतीच्या कार्याची माहिती दिली.
प्रा. बापट यांनी काव्यवाचनाची सुरुवात गणेश व सरस्वती आराधनेने केली. दीड तास रंगलेल्या काव्यमैफिलीत गीते, कविता, काव्य, वात्रटिका, चारोळी, बालगीते, बडबड गीते, विडंबन, लोचटिका, स्वातंत्र्य गीते यांद्वारे रसिकांशी संवाद साधून सादरीकरणातून वाहवा मिळवली.
कवी वसंत बापट यांची न प्रकाशित झालेली कविता, बाबा आमटे, कुसुमाग्रज, जगदीश खेबुडकर, बहिणाबाई चौधरी, सुधीर मोघे, फ. मु. शिंदे, साने गुरुजी यांनी लिहिलेल्या कविता सादर करून उपस्थितांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले. 'ऊन ऊन खिचडी' व 'आकाश मोगरा' या कविता रसिकांना अधिक भावल्या. बहिणाबाई या निरक्षर असल्या तरी त्यांना स्फुरलेली कविता जीवनाचे सार सांगणारी होती आणि म्हणूनच जळगाव विद्यापीठाला त्यांचे नाव देऊन त्यांच्या साहित्याचा सन्मान करण्यात आल्याबाबत अभिमानाने सांगितले.
दीड तासाहून अधिक वेळ चाललेल्या या कार्यक्रमात प्रा. विसुभाऊ बापट यांनी स्वतः हार्मोनियम, तर कुमार भाट्ये यांनी तबलासाथ दिली. प्रा. विसुभाऊ बापट गेली ४५ वर्षे कविता सादरीकरणाच्या माध्यमातून मराठी भाषेची सेवा करीत आहेत. देवरूखमध्ये त्यांचा ३,१४० वा कार्यक्रम पार पडला. प्रा. बापट यांनी मराठीसारख्या अमृताच्याही पैजा जिंकू शकणाऱ्या मराठी भाषेकडे आपण सर्वच दुर्लक्ष करत आहोत हे अयोग्य आहे, असे आवर्जून नमूद केले. वाचनालयाने हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्रा. बापट यानी वाचनालय चालकांना धन्यवाद दिले आणि रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी