
मुंबई, 20 डिसेंबर (हिं.स.)। स्नॅपचॅटनं व्हिडिओ क्रिएशन अधिक सोपं आणि मजेदार करण्यासाठी ‘क्विक कट’ नावाचं नवं टूल सादर केलं आहे. या सुविधेमुळे वापरकर्त्यांना त्यांच्या मेमरीज किंवा कॅमेरा रोलमधील फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स केवळ काही सेकंदांत बीट-सिंक व्हिडिओमध्ये रूपांतरित करता येणार आहे. ही सुविधा सध्या आयओएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असून लवकरच अँड्रॉइडवरही येणार आहे.
क्विक कट हे लेंस-पॉवर्ड व्हिडिओ एडिटिंग टूल असून निवडलेले फोटो किंवा क्लिप्स आपोआप म्युझिकच्या बीटशी सिंक करून शेअर करण्यायोग्य व्हिडिओ तयार करतं. याआधी व्हिडिओ तयार करण्यासाठी मॅन्युअली ट्रिमिंग, क्लिप्सची मांडणी आणि म्युझिक सिंकिंग करावी लागत होती, मात्र आता फक्त मीडिया निवडताच लगेच तयार व्हिडिओचा प्रिव्ह्यू दिसतो. ही सुविधा मेमरीज किंवा कॅमेरा रोलमधून थेट वापरता येते, तसेच इतरांनी शेअर केलेल्या क्विक कट व्हिडिओंमध्येही स्वतःचं मीडिया जोडता येतं.
स्नॅपचॅटनुसार, क्विक कट आपोआप साउंड्स लायब्ररीतील ट्रॅक जोडतो आणि क्लिप्स त्यानुसार सिंक करतो. वापरकर्ते लेंस कॅरोसेलमधून विविध टेम्प्लेट्स वापरून कस्टमायझेशन करू शकतात किंवा साउंड्स ऑप्शनमधून म्युझिक बदलू शकतात. ही एडिटिंग इंटरफेस इंस्टाग्राम रील्ससारखीच असून, इच्छेनुसार अॅडव्हान्स्ड एडिटिंगसाठी टाइमलाइन एडिटर उघडता येतो. यात ऑटो कॅप्शन्स, व्हॉइसओव्हर, लिंक्स यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत. अॅडव्हान्स्ड एडिटिंग न करताही व्हिडिओ थेट शेअर, सेव्ह किंवा नंतर एडिट करता येतो.
क्विक कट हे स्नॅपचॅटच्या क्रिएटर टूल्सच्या सूटचा भाग असून, डायरेक्टर मोडमधील टाइमलाइन एडिटरसोबत मिळून व्हिडिओ तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत मोठ्या प्रमाणात कमी करतो. प्रगत एडिटिंग कौशल्य नसलेल्या क्रिएटर्ससाठी हे टूल विशेष उपयुक्त ठरणार आहे.
यासोबतच, स्नॅपचॅटनं 2025 च्या अखेरीस ‘स्नॅप रेकॅप 2025’ देखील रोल आउट केलं आहे. या रेकॅपमध्ये वापरकर्त्यांना वर्षभरातील स्नॅप्स, स्टोरीज आणि चॅट्समधील हायलाइट्सचा एक छोटा व्हिडिओ सारांश पाहता येतो. हा रेकॅप मेमरीज सेक्शनमध्ये ‘युअर 2025 स्नॅप रेकॅप’ या कार्ड स्वरूपात दिसतो.
स्नॅपचॅटनुसार, 2025 मध्ये मैत्री, क्रिएटिव्हिटी आणि कनेक्शन हे प्रमुख ट्रेंड्स ठरले. जगभरात दररोज सुमारे 1.7 अब्ज मिनिटांचा टॉक टाइम झाला असून, तो मागील वर्षाच्या तुलनेत 30 टक्क्यांनी अधिक आहे. अमेरिकेत 5 अब्जांहून अधिक व्हॉइस नोट्स पाठवण्यात आल्या, तर ग्रुप चॅट्समधील मेसेजेसमध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली. काही वापरकर्त्यांनी एका वर्षात तब्बल 8,880 पेक्षा जास्त मेसेजेस पाठवल्याचंही समोर आलं आहे.
क्विक कट आणि स्नॅप रेकॅप या दोन्ही सुविधांमुळे स्नॅपचॅटवर व्हिडिओ तयार करणं आणि वर्षभरातील आठवणी जपणं अधिक सोपं, जलद आणि मजेदार झालं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule