
एकट्या भाजपाचे ४८ टक्के नगरसेवक विजयी
नागपूर, 21 डिसेंबर (हिं.स.) : नगरपालिका निवडणुकांच्या निकालात महायुतीने मोठे यश मिळवले असून, एकूण निवडून आलेल्या नगराध्यक्षांपैकी सुमारे ७५ टक्के नगराध्यक्ष हे महायुतीचे आहेत, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. तसेच, एकूण नगरसेवकांपैकी ४८ टक्के नगरसेवक हे एकट्या भारतीय जनता पक्षाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक निकालानंतर नागपुरात फडणवीस म्हणाले की, मी यापूर्वीच भाकीत केले होते की निवडून येणाऱ्या नगराध्यक्षांपैकी ७५ टक्के महायुतीचे असतील आणि जनतेने तसाच कौल दिला आहे. विशेषतः भारतीय जनता पक्ष हा पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार सुमारे १२९ नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले असून, महायुतीच्या तिन्ही पक्षांचे मिळून जवळपास ७५ टक्के नगराध्यक्ष आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. नगरसेवकांच्या बाबतीत भाजपने नवा विक्रम नोंदवला असून, २०१७ मध्ये भाजपचे १६०२ नगरसेवक होते, तर यावेळी त्याहून अधिक म्हणजे ३३२५ नगरसेवक निवडून आले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या यशाचे श्रेय सकारात्मक प्रचाराला दिले. “या निवडणुकीत मी कोणत्याही विरोधकावर किंवा पक्षावर टीका न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावर मते मागितली. आम्ही केलेली आणि भविष्यात करणार असलेली कामे जनतेसमोर मांडली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असे फडणवीस म्हणाले.महायुतीतील सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही त्यांनी अभिनंदन केले. तसेच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने पहिल्यांदाच ही निवडणूक लढवत मोठे यश मिळवल्याबद्दल त्यांचेही कौतुक केले. गेल्या २०–२५ वर्षांच्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात इतका मोठा विजय कुणालाही मिळालेला नाही. हा विजय म्हणजे जनतेने आमच्या विकासकामांना दिलेली पावती आहे,” असे सांगत फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले.--------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी