निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली काम करतोय- ममता बॅनर्जी
कोलकाता, 22 डिसेंबर (हिं.स.) : निवडणूक आयोग आता स्वतंत्र घटनात्मक संस्था न राहता भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केला. पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे आयोजित तृणम
ममता बॅनर्जी,


कोलकाता, 22 डिसेंबर (हिं.स.) : निवडणूक आयोग आता स्वतंत्र घटनात्मक संस्था न राहता भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केला. पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे आयोजित तृणमूल काँग्रेस पक्षाच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

ममता बॅनर्जी यांनी विशेष गहन पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला. मतदार यादी तयार करताना मोठ्या प्रमाणावर चुका होत असून ही प्रक्रिया जाणीवपूर्वक राबवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काही विशिष्ट समुदायांचे मतदानाचे हक्क हिरावून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत त्यांनी लोकशाहीला धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली.एसआयआर प्रक्रियेदरम्यान जे नगरसेवक आणि पक्ष कार्यकर्ते निष्क्रिय राहतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. बूथ स्तरावरील एजंटांनी सतर्क राहून मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

भाजपवर टीका करताना बॅनर्जी म्हणाल्या की, मटुआ समुदायाचे मतदानाचे हक्क कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप प्रशासकीय संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच केंद्र सरकारकडून पाठवण्यात आलेल्या मायक्रो ऑब्झर्व्हरच्या नियुक्तीवरही त्यांनी आक्षेप नोंदवला. या अधिकाऱ्यांना स्थानिक भाषा आणि परिस्थितीची माहिती नसल्यामुळे सामान्य मतदारांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ममता बॅनर्जी यांनी दावा केला की सुमारे 1.5 कोटी मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न सुरू आहे, जो लोकशाहीसाठी मोठा धक्का असल्याचे त्यांनी म्हटले. बर्धमानमध्ये बाहेरील राज्यांतून, विशेषतः बिहारमधून मोटारसायकली आणून निवडणुकांसाठी बाहेरील लोक आणले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हा केवळ निवडणुकीचा प्रश्न नसून लोकशाही वाचवण्याची लढाई असल्याचे सांगत ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की जनतेच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तृणमूल काँग्रेस प्रत्येक पातळीवर संघर्ष करेल. बंगालमध्ये भाजपची घुसखोरी रोखण्याचे काम टीएमसीचे कार्यकर्तेच करू शकतात, असेही त्या म्हणाल्या. तसेच भाजप बंगालमध्ये मुस्लीम समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande