
वॉशिंग्टन , 23 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नौदलासाठी एक नवीन, भव्य युद्धनौका (बॅटलशिप) बांधण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. ट्रम्प या जहाजाला “बॅटलशिप” म्हणत असून, ही योजना त्यांच्या “गोल्डन फ्लीट” उभारण्याच्या व्यापक दृष्टिकोनाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. फ्लोरिडातील त्यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये केलेल्या घोषणेदरम्यान ट्रम्प म्हणाले, “ही जहाजे सर्वांत वेगवान, सर्वांत मोठी असतील आणि आजपर्यंत तयार झालेल्या कोणत्याही बॅटलशिपपेक्षा १०० पट अधिक शक्तिशाली असतील.”
ट्रम्प यांच्या मते, या श्रेणीतील पहिले जहाज “यूएसएस डिफायंट” असेल. हे दुसऱ्या महायुद्धातील आयोवा-क्लास बॅटलशिपपेक्षा अधिक लांब आणि मोठे असेल. या जहाजात हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे, अणु-क्रूझ क्षेपणास्त्रे, रेलगन आणि उच्च क्षमतेचे लेझर बसवले जाणार आहेत. या सर्व तंत्रज्ञानांचा विकास सध्या अमेरिकन नौदलाकडून वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरू आहे.
‘गोल्डन फ्लीट’साठी तयार करण्यात आलेल्या एका नव्या संकेतस्थळानुसार, ही नवी “गाइडेड मिसाइल बॅटलशिप” आकाराने आयोवा-क्लास बॅटलशिपच्या जवळपास असेल, मात्र वजनाने सुमारे निम्मी म्हणजेच सुमारे ३५,००० टन असेल. तसेच, या जहाजावर तुलनेने कमी कर्मचारी असतील. या जहाजाचे मुख्य शस्त्र मोठ्या नौदल तोफांऐवजी क्षेपणास्त्रे असतील. एका अमेरिकी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, नव्या जहाजाच्या डिझाइनवर सध्या काम सुरू असून, २०३० च्या सुरुवातीस बांधकाम सुरू करण्याची योजना आहे.
बॅटलशिप ही एक खास प्रकारची मोठी, जाड कवच असलेली युद्धनौका असते. या जहाजांवर प्रचंड मोठ्या तोफा बसवलेल्या असत, ज्या इतर जहाजांवर किंवा किनाऱ्यावरील लक्ष्यांवर मारा करण्यासाठी वापरल्या जात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अशा जहाजांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असे. अमेरिकेच्या आयोवा-क्लास बॅटलशिप सुमारे ६०,००० टन वजनाच्या होत्या. मात्र, दुसऱ्या महायुद्धानंतर एअरक्राफ्ट कॅरिअर आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या आगमनामुळे आधुनिक नौदलात बॅटलशिपचे महत्त्व झपाट्याने कमी झाले. १९८० च्या दशकात अमेरिकन नौदलाने चार आयोवा-क्लास बॅटलशिपना क्रूझ क्षेपणास्त्रे, अँटी-शिप मिसाइल्स आणि आधुनिक रडारने सुसज्ज केले होते, पण १९९० च्या दशकात त्या सर्व सेवेतून निवृत्त करण्यात आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode