
इस्लामाबाद , 23 डिसेंबर (हिं.स.)।पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना घडली आहे. मंगळवार, २३ डिसेंबर रोजी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील करक जिल्ह्यात एका पोलिस वाहनावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पाच पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, जिल्हा पोलिस प्रवक्त्यांनी या घटनेची तसेच मृत पोलिस कर्मचाऱ्यांच्या संख्येची अधिकृत पुष्टी केली आहे. जिल्हा पोलिस प्रवक्त्यांनी शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये हल्ल्याचे लक्ष्य ठरलेले पोलिस वाहन पूर्णपणे जळून खाक झाल्याचे दिसत आहे. या वाहनात बसलेला कोणीही पोलिस कर्मचारी हल्ल्यानंतर जिवंत राहण्याची शक्यता नसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येते. वाहनावर गोळ्यांच्या खुणा स्पष्ट असून, आधी गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर वाहनाला स्फोटकांच्या साहाय्याने उडवून दिले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
खैबर पख्तूनख्वा हा प्रांत जणू तेथील लष्कर आणि पोलिसांसाठी कब्रस्तान ठरत असल्याचे चित्र आहे. या भागातील अनेक परिसरांमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून सातत्याने हल्ले केले जात आहेत.अहवालानुसार, गेल्याच आठवड्यात खैबर पख्तूनख्वामधील लक्की मारवत येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एका पोलिस अधिकाऱ्यासह त्यांच्या भावाचाही मृत्यू झाला होता तर पाच जण जखमी झाले होते. त्याआधी नोव्हेंबर महिन्यात हंगू येथे एका तपासणी नाक्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी गेलेले तीन पोलिस कर्मचारी ठार झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode