
नवी दिल्ली , 24 डिसेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘दिल्ली मेट्रो फेज–5 (A)’ च्या विस्तार प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 12,015 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला हिरवा कंदील दाखवण्यात आला असून, त्यामुळे दिल्लीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रोच्या फेज–5A ला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत 13 नवीन मेट्रो स्थानके उभारण्यात येणार असून, त्यामध्ये 10 भुयारी (अंडरग्राउंड) आणि 3 उंचावरची (एलिव्हेटेड) स्थानके असतील. 12,015 कोटी रुपयांच्या खर्चातून 16 किलोमीटर लांबीची नवी मेट्रो लाईन उभारली जाईल. हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. यानंतर दिल्ली मेट्रोचे एकूण नेटवर्क 400 किलोमीटरपेक्षा अधिक होईल.”
फेज–5A अंतर्गत प्रमुख विस्तार: रामकृष्ण आश्रम मार्ग ते इंद्रप्रस्थ- 9.9 किलोमीटर ट्रॅकचा विस्तार खर्च – 9,570.4 कोटी रुपये, एअरोसिटी ते एअरपोर्ट टर्मिनल–1: 2.3 किलोमीटर ट्रॅकचा विस्तार, खर्च – 1,419.6 कोटी रुपये, तुगलकाबाद ते कालिंदी कुंज: 3.9 किलोमीटर ट्रॅकचा विस्तार
खर्च – 1,024.8 कोटी रुपये. दिल्ली मेट्रोच्या या विस्तारासाठी केंद्र सरकार 1,759 कोटी रुपये देणार असून, दिल्ली सरकारलाही तेवढीच रक्कम द्यावी लागणार आहे. उर्वरित सुमारे 5,000 कोटी रुपये कर्जाच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या मते, मेट्रो विस्तारामुळे दिल्लीतील प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
या मंजुरीनंतर दिल्ली मेट्रो जगातील सर्वात मोठ्या शहरी रेल्वे नेटवर्कपैकी एक म्हणून आपली स्थिती अधिक मजबूत करणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पुढील तीन वर्षांत हे नवे कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर दिल्ली मेट्रोचे एकूण कार्यरत नेटवर्क 400 किलोमीटरचा टप्पा ओलांडेल. ही एक मोठी उपलब्धी असून, त्यामुळे दिल्ली मेट्रो लंडन आणि न्यूयॉर्कसारख्या आंतरराष्ट्रीय शहरांच्या मेट्रो प्रणालींच्या तोडीस तोड ठरेल.
अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाला ऐतिहासिक म्हटले. ते म्हणाले, “दिल्ली मेट्रोच्या विस्तारासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली मेट्रोने दिल्लीतील नागरिकांचे आणि येथे ये-जा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे जीवन सकारात्मकरीत्या बदलले आहे. या विस्तारामुळे दिल्ली मेट्रोच्या इतिहासात एक नवे पर्व जोडले जाईल. यासाठी 12,015 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.”
दिल्ली मेट्रोच्या विस्ताराची ही घोषणा अशा वेळी झाली आहे, जेव्हा राजधानीत प्रदूषण आणि वाहतूक कोंडी ही मोठी आव्हाने ठरत आहेत. सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणारा हा निर्णय केवळ प्रवाशांची सोय वाढवणारा नसून, पर्यावरणपूरक शहरी विकासाच्या दिशेनेही एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. आता ही महत्त्वाकांक्षी योजना ठरवलेल्या तीन वर्षांच्या कालमर्यादेत पूर्ण करण्याची जबाबदारी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर असणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode