
ट्विटरवर शेअर केला अडवाणी-मोदींचा जुना फोटो
नवी दिल्ली, 27 डिसेंबर (हिं.स.) । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे छायाचित्र शेअर करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची प्रशंसा केली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला वेग आला असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांचे 1990 च्या दशकातील एक जुने कृष्णधवल छायाचित्र शेअर केले आहे. या छायाचित्रात नरेंद्र मोदी हे लालकृष्ण अडवाणी यांच्या पायाजवळ जमिनीवर बसलेले दिसत आहेत. या छायाचित्रासोबत त्यांनी लिहिले की, “संघाचा जमीनीवर काम करणारा स्वयंसेवक आणि भाजपचा कार्यकर्ता खाली बसून मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान बनतो हीच या संघटनेची ताकद आहे. या पोस्टद्वारे दिग्विजय सिंह यांनी भाजप आणि तिच्या वैचारिक अधिष्ठान असलेल्या संघाच्या संघटनात्मक रचनेचे कौतुक केले. सामान्य कार्यकर्ता संघटनेतून पुढे जात राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान कसा बनू शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. सोबतच दिग्विजय यांनी हे छायाचित्र काँग्रेस पार्टी, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांना देखील टॅग केले आहे. काही दिवसांपूर्वी दिग्विजय सिंह यांच्या लहान भावाने काँग्रेस विरोधात वक्तव्य केले होते. त्यानंतर आता दिग्विजय यांनी केलेल्या ट्विटमुळे काँग्रेस पक्ष आणि राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवर (एक्स) सांगितले की, हे छायाचित्र त्यांना क्वोरा या संकेतस्थळावर आढळले. त्यांनी या छायाचित्राला प्रभावी असे संबोधत संघ-भाजपच्या जमीनीवरील कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या संधींचे उदाहरण म्हणून त्याचा उल्लेख केला.मिळालेल्या माहितीनुसार, हे छायाचित्र 1996 मधील असल्याचे सांगितले जात आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान हे छायाचित्र काढण्यात आले होते. त्या वेळी भाजपचे अनेक वरिष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी