
त्रिशूर, 27 डिसेंबर (हिं.स.)। केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील मट्टाथूर पंचायत समितीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. काँग्रेसचे 8 सदस्य पक्ष सोडून भाजपाच्या पाठिंब्याने टेसी जोस कल्लरक्कल यांची नवीन पंचायत अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. काँग्रेस नेतृत्वाविरोधातील नाराजीमुळे हे पाऊल उचलण्यात आले असून, यामुळे मट्टाथूरमधील डाव्या आघाडीचे 23 वर्षांचे शासन संपुष्टात आले आहे. या अनपेक्षित राजकीय घडामोडींनी स्थानिक राजकारणातील सर्वांनाच धक्का बसला आहे.
त्रिशूर जिल्ह्यातील मट्टाथूर पंचायत सिमीतीमध्ये काँग्रेसच्या सर्व 8 निर्वाचित सदस्यांनी एकत्रितपणे राजीनामा दिला आणि पंचायतवर नियंत्रण मिळवण्यासाठी भाजपाशी हातमिळवणी केली. काँग्रेसचे बंडखोर नेते टेसी जोस कल्लरक्कल भाजपाच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या नव्या आघाडीच्या नेत्या ठरल्या असून, त्या नव्या पंचायत अध्यक्ष बनल्या आहेत. यामुळे मट्टाथूरमधील डाव्या आघाडीचे 23 वर्षांचे वर्चस्व समाप्त झाले आहे. एकूण 24 सदस्यांच्या पंचायत निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला (एलडीएफ) 10, युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) 8, एनडीएला 4 जागा मिळाल्या, तर 2 अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. दोन्ही बाजूंमध्ये चुरशीची टक्कर असल्याने अध्यक्ष निवडीसाठी लॉटरी काढण्याचाही विचार करण्यात आला होता. यूडीएफने अपक्ष उमेदवार के. आर. ओसेफ यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पंचायत अध्यक्ष निवडीच्या अगदी आधी ओसेफ यांनी एलडीएफमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेस नेत्यांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या आठही सदस्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या राजीनाम्यात स्थानिक काँग्रेस नेतृत्वाने अन्याय केल्याचा आणि निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.
पक्ष सोडल्यानंतर या सदस्यांनी टेसी जोस कल्लरक्कल यांना अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा दिला. भाजपानेही त्यांना 3 मते दिली (भाजपाचे एक मत अवैध ठरले), आणि एकूण 12 सदस्यांच्या पाठिंब्याने त्या विजयी ठरल्या. राजीनामा देणाऱ्या नगरसेवकांमध्ये मिनिमोल, श्रीजा, सुमा अँटनी, अक्षय संतोष, प्रिंटो पल्लीपरंबन, सी. जी. राजेश, सी. बी. पॉलोज आणि नूरजहान नवाज यांचा समावेश आहे. या संपूर्ण घटनेमुळे काँग्रेस आणि डावी आघाडी दोघेही चकित झाले असून, भाजपाच्या मदतीने काँग्रेसच्या बंडखोर नेत्या पंचायत अध्यक्ष बनणे ही एक अनपेक्षित आणि नवी राजकीय आघाडी उदयास आल्याचे मानले जात आहे. आतापर्यंत काँग्रेसने राजीनामा दिलेल्या 8 सदस्यांविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. तर भाजपाने या निर्णयाला “पंचायतच्या जनादेशाचा सन्मान करणारा” असा निर्णय असल्याचे म्हटले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी