
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ट्विट करत दिली माहिती
नाशिक, 27 डिसेंबर (हिं.स.)। नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी द्वारका चौकाच्या सुधारणेकरता 214 कोटी रुपयांच्या तरतूदीसह प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलीय. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज, शनिवारी ट्विट करत याबाबत माहिती दिली.
यासंदर्भात गडकरींनी सांगितले की, नाशिकमधील द्वारका चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि परिसराच्या सुधारणेसाठी 214 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. ज्यात उड्डाणपूल आणि इतर विकासकामांचा समावेश आहे, ज्यामुळे मुंबई, पुणे आणि औरंगाबादहून येणाऱ्या वाहनांची कोंडी कमी होऊन या महत्त्वाच्या चौकातील वाहतूक सुलभ होईल. तसेच या प्रकल्पामुळे नाशिक शहरातील वाहतूक सुरळीत होईल. मालवाहतूक व सार्वजनिक वाहतूकिची कार्यक्षमता वाढण्यास मदत मिळेल असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.
याप्रकल्पाचा उद्देश नाशिकच्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडी कमी करणे आणि परिसराचा विकास करणे असा आहे. तसेच या प्रकल्पात उड्डाणपूल बांधकामाचा समावेश आहे, जो वाघ कॉलेज ते जत्रा पॉइंट, आडगाव पर्यंत जातो. सध्या या उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे द्वारका ते औरंगाबाद नाका या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई, पुणे आणि औरंगाबादहून येणाऱ्या वाहनांना द्वारका सर्कल पार करणे सोपे होईल आणि वाहतूक सुरळीत होईल. या मंजुरीमुळे नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल अपेक्षित आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठी सोय होणार आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी