वर्षअखेरनिमित्त अलिबाग तालुक्यात अवजड वाहनांना तातडीने बंदी घालण्याची मागणी
रायगड, 28 डिसेंबर (हिं.स.)। सध्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनाचा हंगाम जोरात सुरू असून थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पर्यटक रायगड जिल्ह्यात, विशेषतः अलिबाग तालुक्यात दाखल होत आहेत. या वाढत्या पर्यटकांमुळे निर्माण होणाऱ्या वाह
अवजड वाहनांना तातडीने बंदी घाला : सुरेश घरत


रायगड, 28 डिसेंबर (हिं.स.)। सध्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनाचा हंगाम जोरात सुरू असून थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पर्यटक रायगड जिल्ह्यात, विशेषतः अलिबाग तालुक्यात दाखल होत आहेत. या वाढत्या पर्यटकांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून बचाव करण्यासाठी पुढील दोन दिवस, म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत अलिबाग तालुक्यात अवजड वाहनांना तातडीने बंदी घालण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी केली आहे.

अलिबाग हे राज्यातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र असून अलिबाग, वरसोली, किहीम, आक्षी, नागाव, रेवदंडा यांसारख्या समुद्रकिनाऱ्यांवर थर्टीफर्स्टच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होते. यावर्षीही सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लाखो पर्यटक अलिबागमध्ये दाखल होत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था खराब असल्याने आधीच वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत अवजड वाहनांची वर्दळ सुरू राहिल्यास कोंडी आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचा वेळ वाया जाणे, अपघाताचा धोका वाढणे तसेच पर्यटनावर आधारित स्थानिक व्यावसायिकांवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट, स्थानिक दुकानदार आणि वाहतूक व्यवसाय पर्यटनावर अवलंबून असून, कोंडीमुळे पर्यटकांमध्ये नाराजी पसरू शकते, असेही सुरेश घरत यांनी नमूद केले.

पर्यटकांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी व्हावा, तसेच अलिबागची पर्यटन प्रतिमा अबाधित राहावी यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अवजड वाहनांना बंदी घालावी आणि वाहतूक पोलीस व प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी जोरदार मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande