
ठाणे, 28 डिसेंबर (हिं.स.)। ठाणे महापालिकेच्या निवडणुकीला प्रथमच दोन्ही ठाकरे बंधु पुर्ण ताकदीने सामोरे जात असल्याने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळु सरकली आहे. त्यामुळेच विकास कामांऐवजी आता नमो...नमो आणि प्रभु श्रीरामाच्या नावाने राजकारण सुरू केले आहे. यावर मनसेचे नेते ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी, भावनिक राजकारण करून लोकांना किती दिवस फसवणार आहात ? असा रोखठोक सवाल प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. तसेच, नमो भारत... नमो ठाणे याच्या उलट मौन भारत आणि मौन ठाणे अशी खिल्ली उडवत अविनाश जाधव यांनी, हाच शांत ठाणेकर या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना जाब विचारल्या शिवाय राहणार नसल्याचे सांगितले.
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी यशस्वी वाटाघाटी झाल्याचे स्पष्ट करून अविनाश जाधव यांनी, रविवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ठाणे पालिकेच्या निवडणुकीला दोन्ही ठाकरे बंधू पूर्ण ताकदीने सामोरे जात असुन ठाणेकर आमच्या पाठीशी उभे राहतील, याबद्दल विश्वास व्यक्त केला. मागील निवडणुकीला आमच्या सोबत कुणी नव्हते तरी, मनसेला 45,000 मते मिळाली. त्यामुळे इथला मराठी माणूस जिवंत आहे हे विसरू नका, ठाणे शहरात जवळपास 70 टक्के मराठी लोक राहतात. हे सर्व मराठी एकत्र आले तर कुणाचीही गरज लागणार नाही. त्यातच, दोघे भाऊ जर एकत्र असतील तर काठावर असलेला मतदार देखील आमच्यासोबत येईल. असेही अविनाश जाधव म्हणाले.
भाजपच्या नमो भारत आणि नमो ठाणे बॅनरबाजी विषयी बोलताना अविनाश जाधव यांनी, सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली. निवडणूका आल्या की, या गोष्टी आठवतात, इतकंच जर वाटतं तर विकासाचे बॅनर लावा. मोदींच्या नमो बॅनरने तसेच, प्रभू श्रीरामाच्या नावाने राजकारण करून तुम्ही किती दिवस लोकांची फसवणूक करणार आहात ? ठाणेकरांना धरण कसे मिळणार याचे बॅनर लावा. वाहतुकीच्या प्रश्नावर मागील वीस वर्षात काहीच काम नाही केलं, याचे देखील बॅनर लावा. ठाणे विचारत आहेत की, या नमोचा अर्थ काय ? नमो च्या उलट 'मौन' भारत, 'मौन ठाणे' म्हणजेच ठाणे शांत आहे, देश शांत आहे. त्यांना डिवचु नका, असा इशाराही अविनाश जाधव यांनी दिला.
सध्या ठाणे शहरात बजबजपुरी माजली आहे. ठाण्यातील
वाहतूक प्रश्न, अपुरा पाणी पुरवठा, क्लस्टरचा प्रश्न असे 100 विषय घेऊन आम्ही या निवडणुकीत ठाणेकरांसमोर जाणार आहोत. तसेच दोन्ही ठाकरे बंधु एकाच व्यासपीठावरून जाहिर सभेला संबोधित करतील, असेही अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर