
रायगडमध्ये सुमारे एक हजार हेक्टरवर हरभरा; कडधान्य क्षेत्र टिकविण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न
अलिबाग, 28 डिसेंबर (हिं.स.) रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने हरभरा पिकाच्या लागवडीवर विशेष भर दिला आहे. यंदा जिल्ह्यात तब्बल ९७३.८० हेक्टर क्षेत्रावर हरभरा लागवड होणार असून बहुतांश तालुक्यांमध्ये पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. सरकारकडून मिळणारे प्रोत्साहन, मोफत बियाणे आणि चांगला बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांचा हरभऱ्याकडे कल वाढताना दिसत आहे.
ऑक्टोबर–नोव्हेंबरमध्ये भात कापणीनंतर उपलब्ध होणाऱ्या ओलसर जमिनीत रब्बी हंगामात कडधान्याची लागवड केली जाते. यामध्ये वाल, पावटा, मूग, मटकी यांसह यंदा हरभऱ्याचे क्षेत्र लक्षणीयरीत्या वाढले आहे. नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या हरभऱ्याला सध्या १०० ते १५० रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची अपेक्षा आहे.
राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुमारे ७८० क्विंटल हरभरा बियाण्यांची वेळेत उपलब्धता करून देण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याला लागवडीचे विशेष उद्दिष्ट देण्यात आले असून कृषी विभागाकडून मार्गदर्शन, प्रात्यक्षिके आणि तांत्रिक मदत दिली जात आहे. एकरी १५ ते २२ क्विंटल उत्पादन घेणे शक्य असून हे पीक ११० ते १२० दिवसांत तयार होते.
हरभरा पोषणमूल्यांनी समृद्ध असून त्यात प्रथिने, फायबर, लोह, फॉस्फरस आदी घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे आरोग्यदृष्ट्याही या पिकाचे महत्त्व मोठे आहे. रब्बी हंगामात कडधान्याचे क्षेत्र जरी कमी झाले असले तरी मोफत बियाणे वाटप व प्रोत्साहनात्मक उपाययोजनांद्वारे हे क्षेत्र टिकवून ठेवण्याचा प्रयत्न कृषी विभाग करत असल्याची माहिती कृषी अधीक्षक वंदना शिंदे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके