
कोल्हापूर, 28 डिसेंबर (हिं.स.)।
भाजपचे राज्यसभा खा. धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणूकीत भाजपचे उमेदवार म्हणून प्रभाग क्र. ३ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माघार घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता, पक्षपातळीवर झालेल्या निर्णयानुसार महापालिका, निवडणूक लढवणार नाही, कृष्णराज महाडिक यांनी खुलासा केला आहे.
कृष्णराज महाडिक हे गो - कार्टींग खेळाचे अंतरराष्ट्रिय खेळाडू आहेत. युथ आयकॉन म्हणून प्रसिद्ध असलेले कृष्णराज यु ट्यूबसह सोशल मिडियावरही ते ॲक्टिव्ह आहेत. त्यांचे लाखोंचे फॉलोअर्स हा देखील चर्चेचा विषय आहे. समाज कार्यातही ते सतत कार्यरत आहेत तर राजकारणात विशेष रस दाखवत त्यांनी आपले वडील खा. धनंजय महाडिक यांचा आदर्श घेऊन वाटचाल केली आहे. महाडिक कुटुंबाचा पश्चिम महाराष्ट्रा प्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकण्यासाठी त्यांनी व्यक्तीगत पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. आगामी काळात कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून किंवा स्थानिक स्वराज्य संस्था मधून विधान परिषद लढवून आमदार होण्याची ते तयारी करीत होते. पण अचानक त्यांनी महानगर पालिकेची निवडणूक लढवून नगरसेवक म्हणून काम करायचे आणि त्यातून महानगर पालिकेचा कारभार आणि कोल्हापूर शहराचा विकास आणि प्रश्न याबाबत जाणून घ्यावे यासाठी त्यांनी कोल्हापूर महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
आपले दोन जेष्ठ बंधू आणि शेकडो समर्थक घेऊन त्यांनी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
खा. धनंजय महाडिक मात्र यावेळी उपास्थित नव्हते. त्यांनी याबाबत कोणतेह मत किंवा प्रतिक्रियाही व्यक्त केली नव्हती.
पण त्याबाबत शहरात, राजकीय क्षेत्रात आणि सोशल मिडियावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. नेत्यांच्या मुलांनी उमेदवारी घेतली तर कार्यकर्त्यांनी काय करायचे. 'खासदार, आमदार, नगरसेवक पद एकाच घरात तर आता ग्रामपंचायतही लढवा' अशा प्रतिक्रिया उमटल्या. अखेर पक्षाच्या वरिष्ठानीच खासदार, आमदार पुत्रांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लढवू नये असे आदेश दिले.
त्यांच्या उमेदवारी अर्जमुळे काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. आता कृष्णराज महाडिक यांनी त्यांचा माघारीचा निर्णय दिला आहे.
कृष्णराज महाडिक यांनी निवडणुकीतून माघार घेणारं असल्याचा निर्णय दिल्यानंतर खुलासा देखील केला आहे. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष ही अत्यंत शिस्तबद्ध संघटना आहे. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून, या पक्षातील कार्यकर्ते काम करत असतात. त्यानुसार पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयाचा आदर राखत, मी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर करत आहे. महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढवणार आहे. अशावेळी इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्यापैकी आणि कोणालाही निवडणूक लढवण्याची संधी मिळावी, या विचारातून मी महापालिका निवडणूक लढवणार नाही. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार, मी निवडणूक लढवण्याचे घोषित केले होते. आता पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयानुसार मी निवडणूक लढवणार नाही. तथापि या निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर माझ्या नावाचा विचार झाला, ही सुद्धा माझ्यासाठी जमेची आणि समाधानाची बाब आहे. यापुढेही समाजकारणात मी नेहमीच कार्यरत राहीन. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठबळ देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा, कुटुंबातील सदस्यांचा मी ऋणी आहे. असे कृष्णराज महाडिक यांनी खुलाशात म्हंटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar