
रायगड, 28 डिसेंबर (हिं.स.)।
अलिबाग तालुक्यातील कुरुळ बायपास ते बेलकडे जाणारा राज्य महामार्ग सध्या अक्षरशः खड्डेमय झाला असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. राज्य महामार्ग असूनही रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून दुचाकीस्वार, रिक्षाचालक, खासगी वाहने तसेच अवजड वाहनांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एमएसआयडीसी) कोट्यवधी रुपयांची निविदा काढल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात रस्त्यावर केवळ काही ठिकाणीच किरकोळ काम सुरू असल्याचे चित्र आहे. संपूर्ण रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे बुजविण्याची किंवा तातडीची डागडुजी करण्याची साधी उपाययोजनाही अद्याप करण्यात आलेली नाही. परिणामी रोज शेकडो वाहनधारकांना अपघाताचा धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे.
पावसाळ्यानंतर खड्ड्यांची तीव्रता अधिक वाढली असून काही ठिकाणी वाहनांचे नुकसान होण्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राज्य महामार्ग असूनही संबंधित विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
या गंभीर परिस्थितीकडे जिल्हा प्रशासनानेही अद्याप ठोस लक्ष दिलेले नाही. जिल्हाधिकारी स्तरावरून पाहणी किंवा तातडीचे आदेश न निघाल्याने नाराजी वाढत आहे. लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नाकडे पाठ फिरवल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
कुरुळ बायपास–बेलकडे हा मार्ग अलिबाग शहरासह तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. पर्यटन, वाहतूक आणि दैनंदिन प्रवासासाठी अत्यावश्यक असलेल्या या रस्त्याची झालेली दुरवस्था प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. नागरिकांनी तातडीने खड्डे बुजवून दर्जेदार दुरुस्ती करण्याची आणि तोपर्यंत सुरक्षिततेसाठी तात्पुरत्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा मोठे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके