
पुणे, 28 डिसेंबर (हिं.स.)।
शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी २५ उमेदवारांची प्रभागनिहाय यादी मंत्री उदय सामंत यांना दिली. त्या यादीनुसार शिवसेनेला जागा देण्याची मागणी भाजपकडे केली आहे. याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील व विजय शिवतारे यांच्यामध्ये चर्चा झाली.
याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून होईल, असे पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे याबाबत अंतिम निर्णय घेतील व शिवसेना २५ जागांवर ठाम आहे,’’ अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘भाजपने देऊ केलेल्या १५ जागा शिवसेनेला मान्य नाहीत. आमची प्रभागनिहाय यादीबाबत बैठक झाली आहे. विजय शिवतारे, रवींद्र धंगेकर, अजय भोसले, आबा बागूल हे यावेळी उपस्थित होते. याबाबत पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे हे अंतिम निर्णय घेतील.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या विजयानुसार १६५ पैकी आम्हाला सरासरी ४७ जागा मिळणे अपेक्षित होते पण आम्ही २५ जागा मागितल्या असून, त्या तरी भाजपने देणे आवश्यक आहे. महापालिका निवडणुकीत सन्मानजनक युती व्हावी, ही शिवसैनिकांची अपेक्षा आहे. अंतिम निर्णय अल्पावधीत होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु