
नांदेड, 28 डिसेंबर (हिं.स.)।
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पदवी प्रमाणपत्राचे फॉर्म भरण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी एका परीक्षा निरीक्षकाने अत्यंत उद्धटपणे वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. गोंधळ सुरू असताना व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मोबाईल फोन संबंधित निरीक्षकाने बळजबरीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकारामुळे विद्यापीठ परिसरात तणाव निर्माण झाला निरीक्षकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी रान उठवले आहे.
विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत सध्या पदवी प्रमाणपत्राचे अर्ज स्वीकारले जात आहेत. यासाठी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून हजारो विद्यार्थी आणि पालक विद्यापीठात येत आहेत. कामाचा वाढता व्याप आणि संथ गतीने चालणाऱ्या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आधीच नाराजी होती. अशातच, एका खिडकीवर माहिती विचारण्यासाठी गेलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना तेथे उपस्थित असलेल्या एका परीक्षा निरीक्षकाने अर्वाच्च भाषेत उत्तरे दिली. तुम्हाला समजते की नाही? अशा शब्दांत पालकांचा अपमान केल्याने वादाला तोंड फुटले.
हा सर्व प्रकार एका जागृत विद्यार्थिनीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यास सुरुवात केली.
हे पाहून संबंधित निरीक्षकाने अर्वाच्च भाषेत बोलणे सुरू केले. त्याने माझे शूटिंग काढण्याचे धाडस कसे झाले? असे ओरडत विद्यार्थिनीच्या दिशेने धाव घेतली आणि तिच्या हातातील फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीमुळे तिथे उपस्थित असलेले विद्यार्थी आणि पालक संतप्त झाले.
घटनेची माहिती मिळताच विविध विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात धाव घेत ठिय्या मांडला. संबंधित निरीक्षकाचे वर्तन हे केवळ बेशिस्तपणाचे नसून एका महिला विद्यार्थिनीशी केलेले गैरवर्तन आहे, असा आरोप संघटनांनी केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis