
नवी दिल्ली , 28 डिसेंबर (हिं.स.)।बांग्लादेशमधील विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादीच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. ढाका मेट्रोपॉलिटन पोलिस (डीएमपी) यांच्या माहितीनुसार, या खळबळजनक हत्येतील दोन मुख्य आरोपी भारतात पळून जाऊन मेघालयात पोहोचले आहेत.
ढाक्यातील डीएमपी मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अतिरिक्त आयुक्त एस. एन. नजरूल इस्लाम यांनी सांगितले की, आरोपी फैसल करीम मसूद आणि आलमगीर शेख यांनी हुलुआघाट सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला आणि स्थानिक सहकाऱ्यांच्या मदतीने मेघालयात पोहोचले. पोलिसांच्या माहितीनुसार, सीमा ओलांडल्यानंतर पूर्ति नावाच्या व्यक्तीने त्यांना स्वीकारले आणि त्यानंतर सामी नावाच्या टॅक्सीचालकाने त्यांना मेघालयातील तुरा शहरापर्यंत पोहोचवले. अधिकाऱ्यांनी हेही स्पष्ट केले की, आरोपींना मेघालयात पोहोचवण्यास मदत करणाऱ्या दोन व्यक्तींना भारतात ताब्यात घेण्यात आले आहे.
बांग्लादेशी पोलिसांनी विश्वास व्यक्त केला आहे की, आरोपींची अटक आणि प्रत्यार्पण सुनिश्चित करण्यासाठी भारतीय यंत्रणांशी औपचारिक तसेच अनौपचारिक पातळीवर समन्वय सुरू आहे.डीएमपीचे अतिरिक्त आयुक्त नजरूल इस्लाम यांच्या मते, दोन्ही देशांच्या यंत्रणांमध्ये सातत्याने संपर्क सुरू आहे. कायद्याच्या चौकटीत राहून जलद कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. सीमा-पार गुन्हेगारी, राजकीय हिंसाचार आणि निवडणूक सुरक्षेशी संबंधित असल्यामुळे हे प्रकरण प्रादेशिक सुरक्षा सहकार्यासाठीही महत्त्वाचे मानले जात आहे.
शरीफ उस्मान हादी हे बांग्लादेशमधील प्रभावी विद्यार्थी नेते होते आणि शेख हसीना विरोधी ‘इन्किलाब मंच’शी संबंधित होते. 12 डिसेंबर रोजी ढाक्याच्या बिजयनगर परिसरात आगामी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये ते ढाका-8 मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून प्रचार करत होते, त्याच दरम्यान त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती. गंभीर अवस्थेत त्यांना उपचारासाठी सिंगापूरला नेण्यात आले, मात्र 18 डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले. हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने आणि हिंसाचार पाहायला मिळाला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode