

अमरावती , 29 डिसेंबर (हिं.स.)।आंध्र प्रदेशातील येलामांचिली परिसरात टाटानगर–एर्नाकुलम एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग लागल्याची गंभीर घटना घडली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.
माहितीनुसार, ज्या दोन डब्यांना आग लागली त्यापैकी एका डब्यात 82 तर दुसऱ्या डब्यात 76 प्रवासी प्रवास करत होते.आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही असून, त्याची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बी-1 आणि एम-2 या डब्यांना आग लागली होती. आग लागली त्या वेळी सर्व प्रवासी शांतपणे झोपलेले होते. लोको पायलटला ट्रेनमध्ये आग लागल्याचे लक्षात येताच त्याने तात्काळ ट्रेन थांबवली आणि अग्निशमन दलाला लगेच माहिती देण्यात आली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत दोन्ही डबे पूर्णपणे जळून खाक झाले होते आणि संपूर्ण स्थानक धुराने भरून गेले होते.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रेनला आग लागल्याची माहिती त्यांना रात्री सुमारे 12.45 वाजता मिळाली. अपघातानंतर आगीच्या तडाख्यात सापडलेल्या बी-1 डब्यातून एक मृतदेह आढळून आला आहे. मृत व्यक्तीची ओळख चंद्रशेखर सुंदरम अशी करण्यात आली आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याव्यतिरिक्त काही इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, प्रवाशांचे सर्व सामान आगीत जळून खाक झाले आहे. या घटनेमुळे विशाखापट्टणम–विजयवाडा मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या सध्या रद्द करण्यात आल्या आहेत.
अपघातानंतर आगीने प्रभावित झालेले दोन्ही डबे ट्रेनपासून वेगळे करण्यात आले आणि ट्रेनला तिच्या अंतिम गंतव्य एर्नाकुलमच्या दिशेने रवाना करण्यात आले. तसेच, अपघातग्रस्त डब्यांतील प्रवाशांनाही लवकरच त्यांच्या गंतव्यस्थळी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. आगीचे कारण शोधण्यासाठी दोन फॉरेन्सिक पथके तपासात गुंतलेली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode