
रायपूर, ३ डिसेंबर (हिं.स.) : छत्तीसगडच्या दंतेवाडा-बिजापूर सीमेवर जवानांनी 12 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान चकमकीत डीआरजीचे तीन जवान शहीद झाले असून दोन जखमी झाले आहेत. बस्तर रेंजचे आयजी सुंदरराज पी. यांनी याची पुष्टी केली आहे.
बस्तर रेंजचे आयजी सुंदरराज पी. यांनी सांगितले की, चकमकीत बीजापूर डीआरजीचे जवान हेड कॉन्स्टेबल मोनू वडारी, रमेश सोडी आणि कॉन्स्टेबल दुकारू गोंडे शहीद झाले. गंगालूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात जवानांचे पथक सतत शोधमोहीम राबवत आहे.
एसपी जितेंद्र यादव यांनी सांगितले की, डीआरजी, एसटीएफ, कोब्रा आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून बीजापूर-दंतेवाडा सीमेवरील वेस्ट बस्तर डिव्हिजन परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. जंगलात शोधमोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत नक्षलवादी ठार झाले.
छत्तीसगड सरकारकडून श्रद्धांजली
मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी म्हटले आहे की, आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. शूर जवानांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. गृहमंत्री विजय शर्मा यांनी सांगितले की, आज आपल्या शूर जवानांच्या शौर्याने इतिहास लिहिला जात आहे. नक्षलवाद अखेरच्या घटका मोजत आहे. त्यांनी शहीद सैनिकांना श्रद्धांजलीही वाहिली.
एसपींनी सांगितले की, जवानांनी चकमकीच्या ठिकाणाहून एसएलआर रायफल, 303 रायफल आणि दारूगोळाही जप्त केला आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे. घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे. परिसर सील करण्यात आला आहे. बॅकअप पार्टीही पाठवण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी