
नवी दिल्ली, 6 डिसेंबर (हिं.स.)अचानक विमानभाडे वाढल्याच्या तक्रारींवर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (MoCA) कडक भूमिका घेतली आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या ऑपरेशनल संकटादरम्यान काही विमान कंपन्या असामान्यपणे जास्त भाडे आकारत असल्याच्या वृत्तांची सरकारने गंभीर दखल घेतली आहे.
प्रवाशांना जास्त किमतीच्या तिकिटांपासून वाचवण्यासाठी, मंत्रालयाने सर्व प्रभावित मार्गांवर भाडे मर्यादा लागू केली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांना कोणत्याही संधीसाधू किमती वाढीपासून वाचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सर्व विमान कंपन्यांना नव्याने निश्चित केलेल्या भाडे मर्यादांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देणारे अधिकृत निर्देश जारी करण्यात आले आहेत. परिस्थिती सामान्य होईपर्यंत हे नियम लागू राहतील.
या निर्देशाचे उद्दिष्ट बाजारभाव नियंत्रण राखणे, अडचणीत आलेल्या प्रवाशांचे शोषण रोखणे आणि गरजूंना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांना आर्थिक अडचणींपासून वाचवणे आहे.
मंत्रालयाने स्पष्ट केले की, या काळात आपत्कालीन प्रवास करणाऱ्या नागरिकांना कोणताही आर्थिक भार सहन करावा लागू नये. मंत्रालय आता एअरलाइन्स आणि ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरील डेटा वापरून विमानभाड्यांचे रिअल-टाइम निरीक्षण करेल. जर कोणतीही विमान कंपनी निर्धारित नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले तर त्याविरुद्ध त्वरित सुधारात्मक कारवाई केली जाईल. एमओसीए भाडे पातळीचे बारकाईने निरीक्षण करेल आणि कोणत्याही विचलनावर त्वरित कारवाई करेल.
इंडिगोच्या अलिकडच्या ऑपरेशनल समस्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे हजारो उड्डाणांवर परिणाम झाला आणि प्रवाशांना पर्यायी व्यवस्थांसाठी जास्त भाडे द्यावे लागले. तज्ञांचा असा विश्वास आहे की या निर्णयामुळे विमान उद्योगात पारदर्शकता वाढेल आणि प्रवाशांच्या हिताचे रक्षण होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे