
बीड, 30 डिसेंबर, (हिं.स.) - माजलगाव तालुक्यातील गेवराई मतदारसंघातील टाकरवण केंद्रांतर्गत दत्तनगर वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांवर शिक्षणासाठी अक्षरशः उघड्यावर बसण्याची वेळ आली आहे. सुसज्ज शाळा इमारत असतानाही गेल्या दोन महिन्यांपासून शाळेकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने विद्यार्थ्यांना लिंबाच्या झाडाखाली, थंडी–ऊन्ह–वारा सहन करत शिक्षण घ्यावे लागत आहे.
या गंभीर प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या मार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री अजितदादा पवार व आमदार पंडित यांना लेखी निवेदन दिले होते. मात्र महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दत्तनगर वस्ती शाळेत इयत्ता १ ते ४ चे ३५ विद्यार्थी शिक्षण घेत असून २ ते ३ शिक्षक कार्यरत आहेत. २००७–०८ मध्ये शासनाने तीन वर्गखोल्यांची इमारत बांधली आहे. मात्र परिसरातील वाढलेल्या बांधकामामुळे मागील दोन महिन्यांपासून शाळेचा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृह, निवारा अशा मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.
प्रशासनाने वारंवार निवेदन देऊनही दखल न घेतल्याने अखेर दि. ३१ डिसेंबर रोजी बीड येथील सहकार संकुल भवनाच्या भूमिपूजनासाठी येणाऱ्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याचा इशारा डॉ. गणेश ढवळे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis