महापालिका निवडणूक : उमेदवारी अर्जांच्या शेवटच्या दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शन
मुंबई, 30 डिसेंबर (हिं.स.)। राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी विविध पक्षांच्या उमेदवारांची जोरदार धावपळ पाहायला मिळाली, जिथे उमेदवारांनी एबी फॉर्म घेऊन अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख
संग्रहित छायाचित्र


मुंबई, 30 डिसेंबर (हिं.स.)। राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी विविध पक्षांच्या उमेदवारांची जोरदार धावपळ पाहायला मिळाली, जिथे उमेदवारांनी एबी फॉर्म घेऊन अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि लातूरमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी राजकीय नाट्य पाहायला मिळाले. उमेदवार आता 2 जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेऊ शकतील, तर मतदान 15 जानेवारीला होणार आहे. मतमोजणी आणि निकाल जाहीर होणे 16 जानेवारी रोजी अपेक्षित आहे.

राज्यातील विविध ठिकाणी उमेदवारांनी समर्थकांसह मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज दाखल केले. पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी नगरसेवक आणि पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही ठिकाणी शक्तीप्रदर्शनामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष बंदोबस्त तैनात केला. प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई होईल असेही सांगितले.

मुख्य लढत:-

मुंबईत यंदाच्या निवडणुकीत ठाकरे गट विरुद्ध शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी यांच्यात मुख्य लढत रंगणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईतील सर्व पक्षांच्या उमेदवारांची प्रचंड धावपळ पाहायला मिळाली. काही उमेदवारांना पक्षाकडून अर्ज न मिळाल्यामुळे बंडखोरीही दिसून आली.

उदाहरणार्थ, मुंबईत ठाकरे गटाचे सूर्यकांत कोळी, प्रीती पाटणकर, चंद्रशेखर वायंगणकर आणि अनिल कोकीळ यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडाचा झेंडा फडकावला. भाजपमध्ये वॉर्ड क्रमांक 200 मध्ये गजेंद्र धुमाळ आणि संजय दास्ताने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. गोरेगावमध्ये भाजपचे विधानसभा महामंत्री संदीप जाधव यांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.

युतीत तणाव:

-राज्यातील 14 महापालिकांमध्ये भाजप-शिंदे गटाची युती तुटली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या शहरांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये बहुरंगी लढती होण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांमध्ये मात्र भाजप-शिंदे गटाची युती कायम आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना युतीतून दूर ठेवण्यात आले असून, त्यामुळे राजकीय समीकरणे वेगळी राहणार आहेत.

राज्यभरातील सर्व महापालिका निवडणुकीसाठी मतदान 15 जानेवारीला होईल आणि 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये युती कायम आहे की तुटली आहे, यावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande