
लातूर, 30 डिसेंबर (हिं.स.)।भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरच्या पाटील प्लाझा येथील भाजप कार्यालयात इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची एक अत्यंत महत्वाची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. लातूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शहरात पुन्हा एकदा भाजपचाच विजय निश्चित करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला.
यापूर्वी २०१२ साली उमेदवारांसाठी शोधाशोध करावी लागत होती, तिथून २०१७ मध्ये 'झिरो टू हिरो' होण्यापर्यंतचा भाजपचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी दिसणारी इच्छुकांची ही विक्रमी गर्दी पक्षाच्या वाढत्या ताकदीची आणि लोकप्रियतेची साक्ष देत आहे, अशी भावना व्यक्त केली.तसेच इच्छुकांची संख्या मोठी असली तरी पक्षाची उमेदवारी प्रत्येकाला मिळणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसते. त्यामुळे ज्यांना तिकीट मिळणार नाही, त्यांनी पक्षावर किंवा उमेदवारावर राग न धरता, तो राग स्वतःच्या कामात रूपांतरित करून पक्षासाठी अधिक जोमाने काम करावे. यावेळी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवायचा असून त्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करावे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रभागातील चारही उमेदवारांनी एकत्रित जाऊन आपल्या परिसरातील मंदिरात प्रचाराचा नारळ फोडावा आणि लातूरच्या विकासासाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी आमदार अभिमन्यू पवार, माजी खासदार सुनील गायकवाड, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, माजी शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे,सुधीर धुत्तेकर, शैलेश गोजमगुंडे, अविनाश कोळी, यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis