
अमरावती, 31 डिसेंबर (हिं.स.)
अमरावती महानगरपालिका निवडणुकीत एक वेगळी आणि विचार करायला लावणारी उमेदवारी समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 10, बेनोडा भीमटेकडी येथून अपक्ष उमेदवार प्रशांत मेश्राम यांनी फाटक्या कपड्यात येत आपला नामांकन अर्ज दाखल करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.नामांकन दाखल करताना ना मोठी रॅली, ना झगमगाट, ना कोणताही खर्चिक प्रचार दिसून आला. लोकांकडून 10 ते 100 रुपयांची वर्गणी गोळा करून त्यांनी राखीव प्रवर्गासाठी लागणारा 2500 रुपयांचा डिपॉजिट भरला. ही निवडणूक पैशांवर नव्हे, तर विचारांवर आणि प्रामाणिक सेवेवर आधारित असावी, असा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला.
“गरिबांचे प्रश्न, अन्यायग्रस्तांचा आवाज आणि प्रामाणिक सेवा हाच माझा अजेंडा आहे,” असे प्रशांत मेश्राम यांनी सांगितले. “माझ्याकडे पैसे नाहीत, म्हणून रॅलीही नाही. मला मतदान करू नका, पण सेवा करणाऱ्या गरीब व्यक्तीला मतदान करा,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.फाटक्या कपड्यात नामांकन दाखल करणारे उमेदवार महाराष्ट्रातील या निवडणुकीतील पहिले उमेदवार ठरण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांच्या या कृतीमुळे पैशांच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सामान्य नागरिकांमध्येही याबाबत चर्चा रंगू लागली आहे.पैशांचा वापर आणि दिखाऊ प्रचाराच्या पार्श्वभूमीवर प्रशांत मेश्राम यांची ही साधी पण ठाम उमेदवारी मतदारांच्या मनाला कितपत भिडते, हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी