
रायगड, 31 डिसेंबर, (हिं.स.)। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने खारघर प्रभाग क्र. ०४ मधून पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस शिल्पा पाठक ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. हा अर्ज दाखल करताना परिसरात मोठा जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी महाविकास आघाडीचे स्थानिक व जिल्हास्तरीय नेते, पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या तसेच असंख्य समर्थक व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना शिल्पा पाठक ठाकूर यांनी सांगितले की, परिवर्तन, पारदर्शकता आणि सुशासन हीच माझ्या राजकीय वाटचालीची प्रमुख उद्दिष्टे आहेत. खारघर परिसरात वेगाने वाढणाऱ्या नागरीकरणामुळे अनेक मूलभूत समस्या निर्माण झाल्या असून, त्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी संवेदनशीलपणे काम करणे गरजेचे आहे. स्थानिक विकास, दर्जेदार नागरी सुविधा, स्वच्छता, नियमित पाणीपुरवठा, वाहतूक कोंडीवर उपाय तसेच आरोग्य व शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर आपण प्राधान्याने काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षेचे प्रश्न, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि युवकांसाठी कौशल्यविकासाच्या योजना राबवण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत, सर्वसामान्य नागरिकांच्या सहकार्याने खारघरचा सर्वांगीण विकास साधण्याचा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, शिल्पा पाठक ठाकूर यांच्या उमेदवारीमुळे खारघर प्रभागात काँग्रेस महाविकास आघाडीला नवे बळ मिळाल्याचे चित्र असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी मतदार सज्ज असल्याचा विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके