चिखलदरा येथील पाणीटंचाई सभा विविध मुद्यांवर गाजली, पाणी टंचाईवर आमदार संतापले, अधिकाऱ्यांचे टोचले कान
अमरावती, 31 डिसेंबर (हिं.स.) तालुक्यातील भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा सभा विविध मुद्यांवर चांगलीच गाजली. या सभेत आमदारांनी पाणीपुरवठा व टँकर व्यवस्थापनातील ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच झापले
चिखलदरा येथील पाणीटंचाई सभा विविध मुद्यांवर गाजली पाणी टंचाई वर आमदार संतापले अधिकाऱ्यांचे टोचले कान


अमरावती, 31 डिसेंबर (हिं.स.)

तालुक्यातील भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा सभा विविध मुद्यांवर चांगलीच गाजली. या सभेत आमदारांनी पाणीपुरवठा व टँकर व्यवस्थापनातील ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. 'मेळघाटातील गावे टँकरमुक्त कधी होणार?' असा थेट सवाल उपस्थित करत, टँकरमुक्तीच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही परिस्थिती 'जैसे थे' असल्याची कठोर टीका करण्यात आली.

सभेत वाकी येथे वर्षानुवर्षे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित झाला.इतक्या वर्षांत कायमस्वरूपी उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, याबाबत अधिकाऱ्यांकडे कोणतेही ठोस उत्तर नसल्याने आमदारांनी संताप व्यक्त केला. 'दरवर्षी टँकर, दरवर्षी खर्च; पण शाश्वत तोडगा शून्य' असे स्पष्ट शब्दांत सुनावण्यात आले.जामली आर येथील तब्बल १ कोटी ३० लाख रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना पूर्णपणे अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप सभेत करण्यात आला. एवढ्या मोठ्या निधीनंतरही गावकऱ्यांना नियमित पाणी मिळत नसल्याने संबंधित योजनेच्या दर्जा, नियोजन व अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रुईपाठा येथील पाण्याची टाकी अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, कोणत्याही क्षणी धोका निर्माण होऊ शकतो. असा इशारा ग्रामस्थांनी दिला मात्र वारंवार निवेदने देऊनही दुरुस्ती अथवा नव्याने टाकी उभारणीबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचेही सभेत उघड झाले.

या सभेत आमदारांनी स्पष्ट निर्देश देत अपयशी योजनांची चौकशी, दोषी ठेकेदारांवर कारवाई, तसेच टँकरमुक्तीसाठी दीर्घकालीन व शाश्वत आराखडा सादर करण्याची मागणी केली. 'मेळघाटातील नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागू नये, ही प्रशासनाची जबाबदारी आहे,' असे सांगत पुढील आढावा बैठकीत ठोस प्रगती न झाल्यास कडक भूमिका घेण्याचा इशाराही देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande