

- देशभरातील एकूण 1337 स्थानकाची निवड, महाराष्ट्रातील 132 स्थानकांचा समावेश
नवी दिल्ली, 4 डिसेंबर (हिं.स.) - अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवरील विकासकामे वेगाने सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील अमगाव, चांदा किल्ला, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, माटुंगा, मुर्तिजापूर जंक्शन, नेताजी सुभाषचंद्र बोस इटवारी जंक्शन, परळ, सावदा, शहाड आणि वडाळा रोड या 15 स्थानकांवरील विकासकामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. खासदार सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते पाटील, डॉ. अमोल कोल्हे, प्रा. वर्षा गायकवाड, संजय पाटील आणि भास्कर भगरे यांनी लोकसभेत लेखी प्रश्नोत्तरात उपरोक्त विषयाची माहिती विचारली आहे
रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील स्थानकांचा दीर्घकालीन, टप्प्याटप्प्याने पुनर्विकास हाती घेतला आहे. देशभरातील एकूण 1337 स्थानकाची निवड त्यासाठी केली असून त्यात महाराष्ट्रातील 132 स्थानकांचा समावेश आहे. इतर स्थानकांवरील कामेही झपाट्याने सुरू आहेत. त्यातील काही स्थानकांची प्रगती खालीलप्रमाणे आहे:
- वाठार स्थानक: नवीन पोर्टिको, स्थानक इमारतीतील सुधारणा, पाणी बूथ, नवीन मुख्य प्रवेशद्वार, पार्किंग क्षेत्र, परिभ्रमण क्षेत्र, प्रवेश दीर्घिका सुधारणा, पार्किंग क्षेत्राची कुंपण भिंत, फलाट क्र. 1 वर शेड, फलाटाचा बाह्यभाग, प्रतीक्षालय सुधारणा, फलक आणि प्रकाशयोजना पूर्ण झाली आहे. अंतिम कामे सुरू आहेत.
- नांदगाव स्थानक: प्रवेश व निर्गम द्वार, फलाट पृष्ठभाग, ‘प्लॅटफॉर्म शेड’ , स्थानक इमारतीतील सुधारणा, बुकिंग ऑफिस, पादचारी पूल, सीमाभिंत, परिभ्रमण क्षेत्र, पार्किंग क्षेत्र, फलक व प्रकाशयोजना पूर्ण झाली आहे. अंतिम कामे सुरू आहेत.
- नांदुरा स्थानक: प्लॅटफॉर्म पृष्ठभाग, प्लॅटफॉर्म शेड, बुकिंग ऑफिस, प्रवेशद्वार, प्रतीक्षालय सुधारणा, शौचालय, स्थानक इमारत, परिभ्रमण क्षेत्र, पार्किंग क्षेत्र, फलक, कोच इंडिकेशन बोर्ड, प्रकाशयोजना व सीमाभिंत पूर्ण झाली आहे. अंतिम कामे सुरू आहेत.
- हडपसर स्थानक: नवीन स्थानक इमारत, प्रतीक्षालय, 12 मीटर पादचारी पूल, भूमिगत टाकी, प्लॅटफॉर्म शेड, प्लॅटफॉर्म पृष्ठभाग सुधारणा, परिभ्रमण क्षेत्र, प्रकाशयोजना, फलक, लिफ्ट, एस्कलेटर व सौंदर्यीकरण पूर्ण झाले आहे. अंतिम कामे सुरू आहेत.
- बारामती स्थानक: प्लॅटफॉर्म शेड, सेप्टिक टाकी, शौचालय, कंपाउंड भिंत, पाणी बूथ, बुकिंग ऑफिस सुधारणा, प्लॅटफॉर्म पृष्ठभाग, प्रतीक्षालय, पोर्टिको, परिभ्रमण क्षेत्र, फलक व प्रकाशयोजना पूर्ण झाली आहे. अंतिम कामे सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी