
नवी दिल्ली, 4 डिसेंबर (हिं.स.) - मुंबई-गोवा महामार्गाचे आत्तापर्यंत ८९.२९ टक्के काम पूर्ण झाले आहे. एप्रिल २०२६ च्या आत हा रस्ता पूर्ण केला जाईल. यात कोणतीही दिरंगाई होणार नाही, अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर गडकरी पुढे म्हणाले की, या रस्त्याचे काम २००९ मध्ये सुरू झाले. एवढ्या वर्षांत अनेक कंत्राटदार बदलले गेले. जमीन अधिग्रहणाची समस्या होती.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे-कोल्हापूर महामार्गाबाबत प्रश्न विचारला. त्यावर गडकरी यांनी सांगितले की, पुणे ते सातारा या रस्त्याचे काम रिलायन्सकडे होते. आता ते रद्द करून या कामाचा पुन्हा आमचा विभाग आढावा घेत आहे. पुण्यातील बायपासच्या सर्व्हिस लेनचे काम विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे. खंबाटकी घाटातल्या नव्या दोन बोगद्यांपैकी एक बोगदा लवकरच सुरू करण्यात येईल. साताऱ्याच्या पुढे कोल्हापूरपर्यंतच्या कामात काही अडचणी आहेत. त्यावर माझी पुढील आठवड्यात बैठक आहे. वर्षभराच्या आत हे काम पूर्ण केले जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी