

नवी दिल्ली, 4 डिसेंबर (हिं.स.) - दिल्लीतील प्रदूषित हवा आणि रुपयाची डाॅलरच्या तुलनेत घसरण या मुद्यांवरून विरोधकांनी केंद्र सरकार विरोधात आज, गुरुवारी संसद परिसरात निदर्शने केली. यावेळी काॅंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस व खासदार प्रियांका गांधी आदी प्रामुख्याने निदर्शने केली. त्यांच्यासोबत द्रमुक, तृणमूल काँग्रेस यांसह डाव्या पक्षांचे खासदार सहभागी झाले होते.
या संदर्भात खरगे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, विषारी हवेबद्दल भाजपाच्या उदासीनतेविरुद्ध संसदेत आमचा निषेध आहे. सरकार फारच निष्काळजीपणे वागत आहे. त्यांनी सर्वसामान्यांच्या आरोग्याशी काहीही देणे-घेणे नाही. मंत्र्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रियांमधून कोणतेही गांभीर्य दिसून येत नाही. त्यामुळे हे सरकार जनता विरोधी असल्याचेही ते म्हणाले.
दुसरीकडे माध्यमांशी बोलताना खरगे म्हणाले की, आज रुपया ९० च्या पुढे गेला आहे. सरकारने कितीही घोषणा दिल्या तरी रुपयाची घसरण देशाची खरी आर्थिक परिस्थिती उघड करते. जर मोदी सरकारची धोरणे योग्य असती तर रुपया घसरला नसता! २०१४ च्या आधी मोदी म्हणाले होते, भारतीय रुपया का घसरत आहे याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल. देश तुमच्याकडून उत्तरे मागत आहे. आम्ही आज मोदींना हाच प्रश्न विचारत आहोत. त्यांना उत्तर द्यावे लागेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी