
मानवी संस्कृतीचा इतिहास पाहिला तर मानवाने निसर्गासोबत सहजीवनाचे नाते निर्माण केले होते. प्राचीन काळात वन, नदी, पर्वत आणि वन्यजीव हे फक्त संसाधने नव्हते, तर सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनाचा केंद्रबिंदू होते. मात्र, औद्योगिकीकरण, नागरीकरण, भौतिकवाद आणि विकासाच्या स्पर्धेने मानवाने निसर्गापासून स्वतःला वेगळे केले आणि परिणामस्वरूप पृथ्वीवरील जीवसृष्टी आज अभूतपूर्व संकटात आहे. ४ डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा ‘वन्यजीव संरक्षण दिन’ हा केवळ स्मरणाचा दिवस नाही, तर पर्यावरणीय संतुलनाच्या संरक्षणाचा आणि मानवी जबाबदारीची पुनर्स्थापना करण्याचा सामाजिक संदेश देणारा दिवस आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर वन्यजीव संरक्षण हा पर्यावरणीय न्याय, सामाजिक नीती, टिकाऊ विकास आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा व्यापक प्रश्न आहे.
वन्यजीव हे केवळ जंगलातील प्राणी नसून पर्यावरणीय व्यवस्था आणि जीवनाच्या शृंखलेतील महत्त्वाचा दुवा आहेत. जैवविविधता ही निसर्गाची संपत्ती असून त्याचा नाश म्हणजे पृथ्वीवरील पर्यावरणीय संतुलनाचा नाश. समाजशास्त्रात ‘इको-फेमिनिझम’, ‘एन्व्हायर्नमेंटल सोशिअलिझम’ आणि ‘ह्युमन-नेचर रिलेशन’ सारख्या संकल्पनांद्वारे किंवा सिद्धांतांद्वारे मानव आणि निसर्गातील असमान सत्ता-संबंधांचा अभ्यास केला जातो. पर्यावरणवादी विचारवंतांच्या मते मानवाने स्वतःला निसर्गाचा स्वामी नव्हे तर त्याचा घटक मानले असते, तर आजची परिस्थिती वेगळी असती. आज जगभरात १० हजारांहून अधिक प्रजाती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत, आणि अनेक प्राणी केवळ इतिहासातील नोंदीत उरले आहेत. वाघ, गेंडा, चित्ता, हिमचित्ता, समुद्री कासव, गिधाडे, डॉल्फिन, तसेच हजारो पक्षी, कीटक आणि सरीसृपांच्या प्रजाती मानवी अतिक्रमणामुळे धोक्यात आहेत.
वन्यजीव संरक्षण हा केवळ पर्यावरणाचा मुद्दा नाही तर सामाजिक प्रश्न आहे. जंगलातील प्राण्यांचे अस्तित्व जंगलावर आणि जंगलाचे अस्तित्व स्थानिक आदिवासी आणि वनसमुदायांवर अवलंबून आहे. आदिवासी समाजाचा जीवनमार्ग हा वनसंस्कृतीशी एकरूप आहे. त्यांच्या लोककथा, नृत्य, पुराणकथा आणि श्रद्धांमध्ये वन्यजीवांचे स्थान अत्यंत पवित्र आहे. पण विकासाच्या नावाखाली जंगलतोड, खाणकाम, धरणे, रेल्वे प्रकल्प आणि नागरी विस्तारामुळे हे समुदाय विस्थापित होत आहेत, त्यांचे जंगलावरचे हक्क कमी होत आहेत आणि मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे. चित्ता, बिबट्या किंवा हत्ती शेतात घुसतो तेव्हा तो दुष्ट प्राणी नसतो; तो त्याच्या नैसर्गिक अधिवासातून हुसकावला गेलेला जीव असतो. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर हा संघर्ष विकास मॉडेलच्या त्रुटींचे प्रतीक आहे, ज्यात निसर्गापेक्षा भौतिक प्रगतीला महत्त्व दिले गेले.
वन्यजीवांचे अस्तित्व पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. उदा. गिधाडांचे प्रमाण घटल्यामुळे भारतात मृत प्राण्यांचे विघटन थांबले, ज्यामुळे संक्रमणांचे प्रमाण वाढले. वाघ, सिंह, बिबट्या यांसारख्या शिकारी प्राणी जीवसाखळीत संतुलन राखतात. मधमाश्या आणि पक्षी परागीकरण करून शेतीची उपज वाढवतात. डॉल्फिन, मगर आणि सागरी जीव हा जलस्रोत आणि सागरी परिसंस्थेच्या आरोग्याचे संकेतक आहेत. म्हणूनच समाजात ‘मानवकेंद्रित विकास’ ऐवजी ‘परिसंस्थाकेंद्रित विकास’ हा दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे.
शिक्षण आणि जागरुकता ही संरक्षणातील महत्त्वाची पायाभूत साधने आहेत. आजची मुले मोबाईल गेम्स आणि आभासी जगात रममाण आहेत, पण जंगलातील पक्ष्यांचा आवाज किंवा नदीचा प्रवाह ऐकण्याची त्यांना संधी मिळत नाही. स्थानिक पर्यावरणावर आधारित शिक्षण, वन्यजीवांच्या क्षेत्रभेटी, आणि नैसर्गिक संसाधनांविषयी संवेदनशीलता निर्माण करणारे अभ्यासक्रम यामुळे पुढील पिढी पर्यावरणाबद्दल जागरूक होईल. सोशल मीडिया देखील माहितीचा प्रभावी दुवा आहे, पण त्याचवेळी ‘भय’, ‘अंधश्रद्धा’, ‘विनाशकारी विचारसरणी’ आणि फक्त मनोरंजन म्हणून वन्यजीव पाहण्याची मानसिकता बदलणे महत्त्वाचे आहे.
कायद्यांच्या दृष्टिकोनातून भारतात १९७२ चा वन्यजीव संरक्षण कायदा, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि प्रोजेक्ट टायगर, प्रोजेक्ट एलिफंट यांसारखे उपक्रम राबविण्यात येतात. परंतु कायदे पुरेसे नसतात, जर मानसिकता बदलली नाही तर. समाजशास्त्रीय दृष्टीने पाहता, संरक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे. सरकार, स्वयंसेवी संस्था, स्थानिक समुदाय, संशोधक, पर्यावरणवादी, मीडिया आणि सामान्य नागरिक यांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. वन्यजीव केवळ ‘जंगलातील वस्तू’ नाहीत, ते पृथ्वीच्या परिसंस्थेचे सजीव नागरिक आहेत आणि त्यांना जगण्याचा अधिकार तितकाच आहे जितका मानवाला.
आज आपण अशा वळणावर उभे आहोत जिथे वन्यजीव संरक्षण हा निवडीचा प्रश्न राहिलेला नाही; तो अस्तित्वाचा प्रश्न आहे. जंगल नसेल तर पाणी नाही, पाणी नसेल तर शेती नाही, आणि शेती नसेल तर मानवाचे जीवनच नाही. म्हणूनच 04 डिसेंबर हा दिवस केवळ उपक्रम किंवा घोषणांचा दिवस नसून आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आपण भविष्याला काय देत आहोत, जीवसृष्टीने परिपूर्ण हिरवी पृथ्वी की निर्जीव वाळवंट?
शेवटी एवढेच वन्यजीवांचे संरक्षण म्हणजे जंगल वाचवणे आणि जंगल वाचवणे म्हणजे पृथ्वीला जिवंत ठेवणे. म्हणून आपल्या जीवनशैलीत बदल करा, निसर्गाशी नाते पुन्हा जोडून घ्या, आणि प्रत्येक जीवप्रकाराला त्याच्या अस्तित्वाचा अधिकार देणारा समाज निर्माण करा. कारण आपण विसरू नये की मानव पृथ्वीचा मालक नाही, तर फक्त तात्पुरता पाहुणा आहे, आणि वन्यजीव हे तिचे खरे वारसदार आहेत.
डॉ. राजेंद्र बगाटे (लेखक, समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत) मो. ९९६०१०३५८२
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी