
नवी दिल्ली, 4 डिसेंबर, (हिं.स.)। टीबी सारख्या गंभीर आजाराविरुद्ध लढा देताना केवळ औषधोपचार नाही तर जनजागृती, प्रशासनिक समन्वय, तंत्रज्ञानाचा वापर आणि जनसहभाग हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत. तसेच या लढ्यात निष्ठेने सेवा देणाऱ्या ‘एनयूएचएम' च्या कर्मचारी वर्गास पगारवाढ आणि सन्मान दिल्यास मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जाईल. टीबी मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वजण एकत्र येऊन यावर काम करु, असं आश्वासन खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांना दिलं.
‘टीबीमुक्त भारत' करण्यासाठी देशपातळीवर १०० दिवसांचे अभियान राबविण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील न्यू महाराष्ट्र सदन येथे भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयामार्फत चालविण्यात येणाऱ्या `टीबी मुक्त भारत' अभियाना अंतर्गत महाराष्ट्रात १०० टक्के टीबी हद्दपार करण्याच्या दृष्टीने केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या.
बैठकीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सामाजिक कल्याण मंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, माजी मुख्यमंत्री खासदारअशोकराव चव्हाण तसेच महाराष्ट्रातील सर्व खासदार, आरोग्य सचिव, अभियानाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आरोग्य मंत्रालयाकडून टीबी मुक्तीचा संपूर्ण आराखडा, त्यातील प्रगती, अडचणी आणि पुढील दिशा यावर सादरीकरण करण्यात आले. टीबीची लक्षणे, उपचार प्रक्रिया, रुग्णांचा मागोवा, औषधांचे वहन, आणि ग्रामीण भागात पोहोचणाऱ्या सेवांचा विस्तार या सर्वांची माहिती यावेळी खासदारांना देण्यात आली.
‘आपण सर्वांनी आपल्या-आपल्या लोकसभा मतदारसंघात या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. समाजातील प्रत्येक घटकाला जागरूक करून १०० टक्के टीबी मुक्तीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी एकत्र काम करणं गरजेचं आहे, असे यावेळी आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले.
ग्रामीण व दुर्गम भागात त्वरित तपासणीसाठी पोर्टेबल एक्स-रे मशीन उपलब्ध करून द्यावं, तपासणी आणि उपचार प्रक्रिया सोपी व सुटसुटीत करण्यासाठी मोबाईल अॅप आधारित चाचणी व्यवस्था मजबूत करावी, रुग्णनिहाय तपशील, उपचार कालावधी, औषधांचे वितरण यावर सतत नजर ठेवण्यासाठी डिजिटल साधनांची सोय करावी. निक्षय पोर्टलमध्ये सुधारणा करण्यात यावी, अशा सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केल्या.
टीबी मुक्तीसाठी निष्ठेने सेवा देणाऱ्या ‘एनयूएचएम' च्या कर्मचारी वर्गाचा पगार अत्यंत कमी आहे. काही ठिकाणी तर कंत्राटी पध्दतीने कर्मचारी काम करत आहेत. कर्मचाऱ्यांचा पगार वाढवावा, त्यांच्या सेवेला स्थिरता देऊन त्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामावून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना द्यावेत. पगारवाढ आणि सन्मान वाढवल्यास मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जाईल, असा मुद्दा खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत लावून धरला. त्यांनी मांडलेल्या या मुद्यांवर उपस्थित सर्व मान्यवरांसह आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
मतदारसंघात टीबी निर्मूलन मोहिमेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करून, प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी मिळून काम केल्यास महाराष्ट्र १०० टक्के टीबी मुक्त होणं शक्य आहे, असे खासदार नरेश म्हस्के यावेळी म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर