
नवी दिल्ली, 4 डिसेंबर (हिं.स.) - भाजपाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांचे पती आणि मिझोरामचे माजी राज्यपाल, ज्येष्ठ विधिज्ञ स्वराज कौशल यांचे आज (४ डिसेंबर) दिल्लीत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. स्वराज कौशल हे सर्वोच्च न्यायालयातील एक नामवंत वकील होते. त्यांची राजकीय आणि कायदेशीर कारकीर्द अत्यंत प्रभावी होती, ज्यात अनेक महत्त्वाच्या नोंदी आहेत.
स्वराज कौशल यांचा जन १२ जुलै १९५२ रोजी हिमाचल प्रदेशच्या सोलानमध्ये झाला होता. त्यांचे शिक्षण दिल्ली विद्यापीठ आणि पंजाब विद्यापीठातून शिक्षण झाले. १९९० मध्ये, अवघ्या ३७ वर्षांच्या वयात त्यांची मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी ते देशातील सर्वात युवा राज्यपाल ठरले. ते ९ फेब्रुवारी १९९३ पर्यंत या पदावर कार्यरत होते. विशेष म्हणजे, त्यांची पत्नी सुषमा स्वराज यांच्या नावावरही देशातील सर्वात युवा कॅबिनेट मंत्री बनण्याचा विक्रम आहे. स्वराज कौशल यांची राजकीय कारकीर्दही चांगली राहिली. १९९८ मध्ये हरियाणा विकास पक्षाचे उमेदवार म्हणून ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आले आणि १९९८ ते २००४ पर्यंत त्यांनी या पदावर काम केले. १९९८-९९ दरम्यान सुषमा स्वराज लोकसभेत आणि स्वराज कौशल राज्यसभेत होते. तर २००० ते २००४ या काळात दोघेही एकाच वेळी राज्यसभा सदस्य होते.
स्वराज कौशल हे उत्तर-पूर्व (ईशान्य) भागातील समस्यांचे मोठे जाणकार मानले जात होते. १९७९ मध्ये अंडरग्राउंड मिझो नेते लालडेंगा यांच्या सुटकेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नंतर ते मिझो नॅशनल फ्रंटचे संवैधानिक सल्लागार बनले आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे मिझोरम शांतता करार तयार झाला, ज्यामुळे २० वर्षांच्या बंडाळीचा अंत झाला. याच योगदानामुळे त्यांना मिझोरामचे राज्यपाल नियुक्त करण्यात आले. आणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस आणि इतर २४ लोकांवर बडोदा डायनामाइट केसमध्ये खोटे आरोप लावण्यात आले. तेव्हा त्यांची कोर्टात बाजू मांडण्याचे काम स्वराज कौशल यांनी केले होते.
डिसेंबर १९८६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सीनियर ॲडव्होकेटचा दर्जा दिला आणि एक वर्षानंतरच ते ॲडव्होकेट जनरल बनले. त्यांनी १३ जुलै १९७५ रोजी अभाविप कार्यकर्त्या आणि संघ प्रचारकांची मुलगी असलेल्या सुषमा स्वराज यांच्याशी विवाह केला. त्यांची मुलगी बांसुरी स्वराज ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीधर असून सध्या बॅरिस्टर म्हणून दिल्ली उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात कार्यरत आहेत. आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात सक्रिय असूनही स्वराज कौशल यांनी नेहमीच एक साधे आणि लो-प्रोफाइल जीवन जगले.
कन्या बांसुरी यांनी सोशल मीडिया साइटवरील एका पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, पापा स्वराज कौशल जी, तुमचे प्रेम, तुमची शिस्त, तुमचा साधेपणा, तुमची देशभक्ती आणि तुमचा अफाट संयम हे माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेत जे कधीही मंदावणार नाहीत. तुमचे जाणे माझ्या हृदयातील सर्वात खोल वेदना म्हणून आले आहे, परंतु माझे मन या विश्वासाला धरून आहे की तुम्ही आता आईसोबत, देवाच्या उपस्थितीत, शाश्वत शांतीत पुन्हा एकत्र आला आहात. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे आणि तुमचा वारसा, तुमची मूल्ये आणि तुमचे आशीर्वाद माझ्या भविष्यातील प्रवासाचा पाया असतील.
राष्ट्र आणि समाजासाठी त्यांनी केलेली सेवा अविस्मरणीय - मुख्यमंत्री रेखा गुप्ता
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की, मिझोरमचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ वकील स्वराज कौशल जी यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. स्वराज कौशल जी यांचे सार्वजनिक जीवन आणि कायद्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान नेहमीच लक्षात राहील. राष्ट्र आणि समाजासाठी त्यांनी केलेली सेवा अविस्मरणीय आहे. या दुःखाच्या वेळी, खासदार सुश्री बांसुरी स्वराज जी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत माझ्या तीव्र संवेदना आहे. देव त्यांच्या दिवंगत आत्म्याला शांती देवो आणि या कठीण काळात त्यांच्या कुटुंबाला शक्ती देवो.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी