केंद्र सरकारने विक्रमी निधीसह महाराष्ट्रात रेल्वे विकासाला दिली गती
नवी दिल्ली, 5 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्रातील रेल्वे जाळ्याच्या विकास आणि विस्तारासाठी केंद्र सरकारने आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वाढीव अर्थसंकल्पीय सहाय्य, जलद प्र
railway development


नवी दिल्ली, 5 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्रातील रेल्वे जाळ्याच्या विकास आणि विस्तारासाठी केंद्र सरकारने आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वाढीव अर्थसंकल्पीय सहाय्य, जलद प्रकल्प अंमलबजावणी आणि व्यापक स्थानक पुनर्विकास उपक्रमांद्वारे अलिकडच्या वर्षांमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीवर प्रकाश टाकला. गेल्या दशकात महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक अनेक पटींनी वाढली आहे, असे त्यांनी नमूद केले. 2009-14 दरम्यान वार्षिक खर्च सरासरी 1,171 कोटी रुपये होता, तो 20 पट वाढून 2025-26 मध्ये 23,778 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, ज्यामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणावर विस्तार आणि आधुनिकीकरणाची कामे शक्य झाली आहेत.

2009-14 आणि 2014-25 या काळात महाराष्ट्र राज्यातील पूर्णपणे/अंशतः नवीन लोहमार्ग सुरू करण्याचे/टाकण्याचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

कालावधी सुरू केलेले नवीन ट्रॅक नवीन ट्रॅक टाकण्याची सरासरी

2009-14 292 Km 58.4 Km/year

2014-25 2,292 Km 208.36 Km/year (३ पेक्षा जास्त वेळा)

दिनांक 01.04.2025 पर्यंत महाराष्ट्रात पूर्णपणे/अंशतः मार्गांसाठी रु. 89,780 कोटी खर्चाच्या एकूण 5,098 किमी लांबीच्या 38 प्रकल्पांना (11 नवीन मार्ग, 02 गेज रूपांतरण आणि 25 दुहेरीकरण) मंजुरी देण्यात आली.

महाराष्ट्रात पूर्णतः/अंशतः हाती घेतलेले काही मुख्य प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत:

क्र. प्रकल्पाचे नाव खर्च (₹ कोटींमध्ये)

1 अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ नवीन मार्गिका (261 किमी) 4,957

2 बारामती-लोणंद नवीन मार्गिका (64 किमी) 1,844

3 वर्धा-नांदेड नवीन मार्गिका (284 किमी) 3,445

4 इंदूर-मनमाड नवीन मार्गिका (360 Km) 18,529

5 वडसा-गडचिरोली नवीन मार्ग (52 किमी) 1,886

6 जालना-जळगाव नवीन मार्ग (174 किमी) 5,804

7 दौंड-मनमाड दुहेरीकरण (236 किमी) 3,037

8 कल्याण-कसारा तिसरा मार्ग (68 किमी) 1,433

9 वर्धा-नागपूर 3रा मार्ग (76 किमी) 698

10 वर्धा-बल्लारशाह 3 या मार्ग (132 किमी) 1,385

11 इटारसी-नागपूर 3रा मार्ग (280 किमी) 2,450

12 राजनांदगाव-नागपूर 3 रा मार्ग (228 किमी) 3,545

13 वर्धा-नागपूर चौथी मार्गिका (79 किमी) 1,137

14 जळगाव-मनमाड चौथी मार्गिका (160 किमी) 2,574

15 भुसावळ-खंडवा तिसरा आणि चौथा मार्ग (131 किमी) 3,285

याशिवाय, गेल्या तीन वर्षात म्हणजेच 2022-23, 2023-24, 2024-25 आणि चालू आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये महाराष्ट्र राज्यात पूर्णत:/अंशतः येणारे 8,603 किमी लांबीचे 98 सर्वेक्षणे (29 नवीन मार्ग, 2 गेज रूपांतरण आणि 67 दुहेरीकरण) मंजूर करण्यात आली आहेत.

केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी असेही अधोरेखित केले की लोहमार्गांचे उन्नतीकरण आणि नूतनीकरण ही एक सतत आणि चालू प्रक्रिया आहे. लोहमार्गाचे नूतनीकरण कालावधी, वाहतूक, स्थिती इत्यादींवर आधारित, निर्धारित निकषांनुसार केले जाते. 2025-26 दरम्यान महाराष्ट्रासह देशभरात (नोव्हेंबर '25 पर्यंत), सुमारे 5,100 किमी लोहमार्गांचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे, 2014-25 दरम्यान (नोव्हेंबर '25 पर्यंत) सुमारे 52,000 किमी लोहमार्गांचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधांचे प्रकल्प मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे , दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, दक्षिण पश्चिम रेल्वे व पश्चिम रेल्वे विभागांच्या अखत्यारीत येतात. वर्ष 2025-26 मध्ये नोव्हेंबर 2025 पर्यंत बदललेल्या रेल्वेमार्गाची लांबी खालीलप्रमाणे :

क्षेत्र वर्ष 2025-26 मध्ये (नोव्हेंबर 2025 पर्यंत) बदललेल्या रेल्वेमार्गाची लांबी किलोमीटरमध्ये

मध्य रेल्वे 271

दक्षिण मध्य रेल्वे 505

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे 196

पश्चिम रेल्वे 345

दक्षिण पश्चिम रेल्वे 155

रेल्वे मंत्रालयाने दूरगामी दृष्टिकोन ठेवून स्थानकांच्या पुनर्विकासासाठी अमृत भारत स्थानक योजना सुरु केली आहे. स्थानकांमध्ये सुधारणांसाठी मास्टर प्लॅन बनवणे व त्यांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करणे याचा या योजनेत समावेश आहे. यासाठी दूरगामी योजनेअंतर्गत शाश्वत व पर्यावरणस्नेही सुधारणा सुचवणे, गरजेप्रमाणे खडीविरहित रेल्वेमार्गांसाठी तरतूद करणे, रेल्वे स्थानकांमध्ये सिटी सेंटरची टप्प्याटप्प्याने उभारणी करणे इत्यादींचा समावेश आहे. आतापर्यंत अमृत भारत स्थानक योजनेत 1337 स्थानकांचा समावेश केला गेला असून त्यातील 132 स्थानके महाराष्ट्रात आहेत.

महाराष्ट्र राज्यातील अमृत भारत स्थानक योजनेतील विकासकामे वेगाने सुरु आहेत. महाराष्ट्र राज्यातील पूर्ण झालेल्या कामांचा तपशील खालील प्रमाणे :

राज्य पूर्ण झालेल्या स्थानकांची संख्या स्थानकांची नावे

महाराष्ट्र 17 आमगाव, बारामती, चांदा किल्ला, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, माटुंगा, मूर्तिजापूर जंक्शन, नेताजी सुभाष चंद्र बोस नांदुरा, इतवारी जंक्शन, परळ, सावदा, शहाड, वडाळा रोड

इतर अनेक स्थानकांवरील कामांनीही चांगला वेग घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे : वाठार स्थानक- नवीन छत, स्थानक इमारतीची सुधारणा, पाणीव्यवस्था, नवीन मुख्य प्रवेश, वाहनतळ,आसपासचा भाग, प्रवेशद्वार लॉबी सुधारणा, वाहनतळाची कंपाऊंड भिंत, फलाट क्रमांक 1 वरील निवारा स्थळ, फलाटांचा पृष्ठभाग नूतनीकरण, प्रतीक्षागृह, दिशादर्शक पाट्या व दिव्यांची डागडुजी पूर्ण झाली असून शेवटचा हात फिरवणे सुरु आहे.

नांदगाव स्थानक - प्रवेश व निकास द्वार , फलाटांचा पृष्ठभाग नूतनीकरण, फलाटावरील छप्पर, स्थानक इमारतीची सुधारणा, तिकीट कार्यालय, रेल्वेमार्गावरील पादचारी पूल, स्थानकाची कंपाउंड भिंत, आसपासची जागा, वाहनतळ, दिशादर्शक पाट्या व दिव्यांची डागडुजी पूर्ण झाली असून शेवटचा हात फिरवणे सुरु आहे.

हडपसर स्थानक - नवीन स्थानक इमारत, प्रतीक्षागृह, 12 मीटर लांबीचा पादचारी पूल, जमिनीखालील टाकी, फलाटावरील छप्पर, फलाटांचा पृष्ठभाग नूतनीकरण, आसपासची जागा, दिशादर्शक पाट्या व दिवे, तसेच उद्वाहन, सरकते जिने, बागेचे सुशोभीकरण ही कामे पूर्ण झाली असून शेवटचा हात फिरवणे सुरु आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande