
नवी दिल्ली, 5 डिसेंबर (हिं.स.)। भारत आणि मलेशिया यांच्यात हरिमाऊ शक्ती -2025 या पाचव्या संयुक्त लष्करी सरावाला आज राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये सुरुवात झाली. हा सराव 5 ते 18 डिसेंबर 2025 दरम्यान आयोजित केला जात आहे. भारतीय तुकडीचे प्रतिनिधित्व प्रामुख्याने डोग्रा रेजिमेंटचे सैनिक करत आहेत तर मलेशियन तुकडीचे प्रतिनिधित्व 25 व्या बटालियन रॉयल मलेशियन आर्मीचे सैनिक करत आहेत.
या सरावात दहशतवादविरोधी कारवायांदरम्यान संयुक्त प्रतिसादांचे समन्वय साधणे, समाविष्ट आहे. दोन्ही बाजू घेराबंदी, शोध आणि नष्ट मोहिमा, हेलिबोर्न ऑपरेशन्स इत्यादी सामरिक कृतींचा सराव करतील. याव्यतिरिक्त, आर्मी मार्शल आर्ट्स रूटीन (एएमएआर), कॉम्बॅट रिफ्लेक्स शूटिंग आणि योग हेदेखील सराव अभ्यासक्रमाचा भाग असतील.
हरिमाऊ शक्ती - 2025 या सरावात दोन्ही बाजू दहशतवादविरोधी कारवायांमध्ये हेलिपॅड सुरक्षित ठेवण्याचा आणि अपघातग्रस्तांना बाहेर काढण्याचा सराव करतील. शांतता राखण्याच्या कारवायांमध्ये संयुक्त राष्ट्रांचे हित आणि विषयपत्रिका अग्रभागी ठेवून सैन्यांची परस्पर कार्यक्षमता वाढवणे तसेच जीवित आणि मालमत्तेचा धोका कमी करणे यावर सामूहिक प्रयत्न केंद्रित असतील.
दोन्ही बाजूंकडून विविध प्रकारच्या लढाऊ कौशल्यांवर संयुक्त सरावांविषयीची मते आणि पद्धती यांचे आदानप्रदान होईल ज्यामुळे सहभागींना एकमेकांकडून शिकण्यास मदत होईल. सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान केल्याने भारतीय लष्कर आणि रॉयल मलेशियन आर्मी यांच्यातील संरक्षण सहकार्याची पातळी आणखी उंचावेल. या सरावामुळे दोन्ही राष्ट्रांमधील मजबूत द्विपक्षीय संबंधदेखील अधिक दृढ होतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule