
नवी दिल्ली , 5 डिसेंबर (हिं.स.) । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना रशियन भाषेत लिहिलेली भगवद्गीताची प्रति भेटवस्तू म्हणून दिली. दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान दिलेली हि भेटवस्तू भारत–रशिया संबंधांना आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जोडणीचे नवे परिमाण देणारी ठरली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की गीतेतील ज्ञान व संदेश जगभरातील कोट्यवधी लोकांना प्रेरणा देतात आणि तिची शिकवण प्रत्येक युगात मानवतेला योग्य दिशा दाखवत राहते.
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदी विमानतळावर स्वतः गेले, याबाबत क्रेमलिनकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. क्रेमलिनने म्हटले आहे की पंतप्रधान मोदी यांनी विमानाकडे जाऊन पुतिन यांची भेट घेण्याचा निर्णय अनपेक्षित होता आणि रशियन अधिकाऱ्यांना याची पूर्वसूचना दिलेली नव्हती. युक्रेन युद्धानंतर ही पुतिन यांची पहिली भारतभेट आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे स्वागत केल्यानंतर पीएम मोदी यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले— माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे दिल्लीमध्ये स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आज संध्याकाळी आणि उद्याच्या आमच्या बैठकींबाबत मी आशावादी आहे. भारत आणि रशियाची मैत्री काळाच्या कसोटीवर खरी उतरली आहे; याचा आपल्या नागरिकांना अपार लाभ झाला आहे.
भारत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज, शुक्रवारी व्लादिमीर पुतिन यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत केले जाईल. त्यानंतर ते राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन करतील. पुढे ते हैदराबाद हाउस येथे द्विपक्षीय आणि प्रतिनिधिमंडळ स्तरावरील चर्चांत सहभागी होतील. प्रतिनिधिमंडळाच्या बैठकीत काही प्रमुख उद्योगपतीही सहभागी होण्याची शक्यता आहे.
आज, शुक्रवारी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन भारत–रशिया बिझनेस फोरममध्ये सहभागी होतील. यानंतर राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांच्या आमंत्रणावरून पुतिन राष्ट्रपती भवनातील भोजमध्ये उपस्थित राहतील आणि त्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन मॉस्कोच्या दिशेने रवाना होतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode