
मुंबई, 8 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय दुचाकी बाजारात हार्ले-डेव्हिडसनने आपली नवी मोटरसायकल X440T अधिकृतपणे लाँच केली आहे. ही मोटरसायकल आधीपासून उपलब्ध असलेल्या X440 ची नवी आणि अधिक प्रगत व्हेरिएंट असून, तरुण वर्गाला लक्षात घेऊन तिची रचना करण्यात आली आहे. स्पोर्टी लूक, आधुनिक तंत्रज्ञान आणि मजबूत परफॉर्मन्स यांचा मिलाफ या बाइकमध्ये पाहायला मिळतो.या नव्या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 2.79 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या किमतीत ही बाईक प्रीमियम 400 सीसी सेगमेंटमध्ये एक आकर्षक पर्याय ठरणार आहे.
X440T या मोटरसायकलमध्ये 440 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर, एअर-ऑइल कूल्ड इंजिन देण्यात आले असून, हे इंजिन 27 बीएचपीची कमाल पॉवर आणि 38 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. बाईकमध्ये सहा स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे, ज्यामुळे शहरात तसेच हायवेवरही शानदार राइडिंगचा अनुभव मिळतो. अतिरिक्त अॅक्सेसरीज आणि उपकरणांमुळे या बाइकीचे एकूण वजन आता सुमारे 192 किलो झाले आहे.
फीचर्सच्या बाबतीत X440T खूपच प्रगत आहे. या मोटरसायकलमध्ये फुल एलईडी लाइटिंग सेटअप, आधुनिक टीएफटी इंस्ट्रूमेंट क्लस्टर, राइड-बाय-वायर थ्रॉटल, रेन आणि रोड असे दोन राइडिंग मोड देण्यात आले आहेत. याशिवाय स्विचेबल एबीएस, स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल, पॅनिक ब्रेकिंग सिस्टीम, यूएसडी फ्रंट फोर्क, 18 इंच अलॉय व्हील्स, ड्युअल चॅनल एबीएस आणि दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक अशी सुरक्षिततेची आधुनिक साधने यात देण्यात आली आहेत.
हार्ले-डेव्हिडसन मोटर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष कोल्जा रेबस्टॉक यांनी सांगितले की, भारतात HD X440 ला मिळालेल्या यशामुळे कंपनीला मजबूत पाया मिळाला असून, X440T ही बाईक नव्या पिढीतील रायडर्ससाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि अधिक स्पोर्टी अनुभव देण्यासाठी आणली आहे. त्यांच्या मते ही मोटरसायकल तरुण ग्राहकांचा विचार करून विकसित करण्यात आली आहे.
बाजारात या मोटरसायकलचा थेट मुकाबला ट्रायम्फ स्पीड ४००, बजाज डोमिनार ४००, रॉयल एनफील्ड स्क्रॅम ४११ आणि केटीएम ड्यूक ३९० यांसारख्या लोकप्रिय बाइक्सशी होणार आहे. दमदार लुक, ताकदवान इंजिन आणि अत्याधुनिक फीचर्समुळे हार्ले-डेव्हिडसन X440T ही भारतातील मिड-साइज प्रीमियम बाईक सेगमेंटमध्ये नवा बेंचमार्क सेट करण्याची क्षमता ठेवते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule